
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक पाऊल उचलण्याचे आश्वासन देत, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी शहरातील गरीब आणि बेघर नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा केली. “शहरातील उर्वरित घरकुल योजना प्रत्येक वार्डात राबवून कोणतेही कुटुंब बेघर राहू देणार नाही,” अशी ठाम हमी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, प्रलंबित घरकुल योजना पूर्ण करण्यावर आपला विशेष भर असेल, असे निंबोरकर यांनी स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या घरकुल योजनांना नवा वेग देणे हे त्यांचे पहिले प्राधान्य असेल. शहरातील सर्व वार्डांना समान न्याय देत, पारदर्शक आणि जलद गतीने हे काम पूर्ण करण्याची बांधिलकी त्यांनी व्यक्त केली.
प्रणोती निंबोरकर म्हणाल्या, “गरिबांचे घरकुल हे फक्त स्वप्न राहू नये. नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास, प्रत्येक पात्र कुटुंबाला आपले स्वतःचे घर मिळावे यासाठी आम्ही ठोस धोरण आखू.”
या घोषणेमुळे शहराच्या मूलभूत गरजा, पायाभूत सुविधा आणि सुसंगत शहर नियोजनाबाबत त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाची चर्चा होत आहे. त्यांच्या या आश्वासनामुळे शहरातील सर्व स्तरातील नागरिकांमध्ये उत्सुकता व आशावाद निर्माण झाला आहे.



