
अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्रनगर चौकात थरार
चंद्रपूर : शहरातील मित्रनगर चौकात गुरुवारी मध्यरात्री एका ४८ वर्षीय इसमाची लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रामनगर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत अवघ्या काही तासांतच आरोपीला शोधून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या. अनैतिक संबंधाच्या संशयातून आणि कौटुंबिक त्रासाला कंटाळून हा धक्कादायक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संतोष अरुण भेंडे (वय ४८, रा. पाळज्ञ, ता. जि. अमरावती) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी अजय उर्फ ॲप्पल शंकर पोहनकर (वय १९, रा. मित्रनगर, चंद्रपूर) या तरुण आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी मध्यरात्री ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर मित्रनगर परिसरात दोन व्यक्तींमध्ये जोरदार भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच रामनगर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता; संतोष भेंडे हा चौकातील सिमेंट झाकणावर रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेला आढळून आला. पोलिसांनी रात्रीच तातडीने बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि शहरातील निर्जन स्थळांवर शोधमोहीम राबवली, परंतु अंधारामुळे सुरुवातीला आरोपीचा कोणताही सुगावा लागला नाही.
शुक्रवारी (२६ जून) सकाळी रामनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, पोलिसांच्या गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, सदर हत्या अजय पोहनकर यानेच केली असून तो सध्या वडगाव परिसरात लपून बसला आहे. पोलिसांनी तात्काळ वडगाव भागात सापळा रचून संशयित अजयला ताब्यात घेतले.
पोलीस कोठडीत आरोपी अजय उर्फ ॲप्पल पोहनकर याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, मृत संतोष भेंडे हा त्याच्या घरी येत-जात असे आणि त्याच्या घरातील महिलांना मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या कारणावरून अजयच्या मनात संतोषबद्दल तीव्र राग धुमसत होता.
गुरुवारी रात्री दोघेही मित्रनगर चौकात आले असता, त्यांच्यात जुन्या कारणावरून पुन्हा जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त अजयने संतोषला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीदरम्यान संतोष डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने सिमेंटच्या झाकणावर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मारहाणीनंतर संतोष केवळ बेशुद्ध पडला असावा असे समजून आपण घाबरून तिथून पळ काढला, अशी कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे. रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



