गडचिरोलीविदर्भ

विकासपली येथे नामकीर्तन महोत्सवाचा गजर! ; धार्मिक कार्यक्रमातून सामाजिक ऐक्याचे दर्शन

“आध्यात्मिक मूल्यांमुळेच समाज आणि देश सशक्त होईल”– भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे

चामोर्शी : हळदवाही–रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रातील विकासपली येथे आयोजित भव्य नामकीर्तन महोत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी विशेष उपस्थिती लावून ग्रामस्थांशी संवाद साधला. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात सामाजिक आणि सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन घडले.

कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना रमेश बारसागडे म्हणाले की, “आजच्या धकाधकीच्या युगात नामकीर्तन आणि भजनासारख्या उपक्रमांची नितांत गरज आहे. अशा कार्यक्रमांमुळे केवळ आपला सनातन धर्म आणि सांस्कृतिक मूल्येच जपली जात नाहीत, तर समाजात सलोखा आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत होते. गाव आणि देश सशक्त करायचा असेल तर आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे अनिवार्य आहे.”

जिल्हाध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच विकासपली गावात आगमन झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने बारसागडे यांचा शाल व श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनीही यावेळी आपले विचार मांडले. धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले. नामकीर्तनाच्या सुरावलींनी संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता.

या सोहळ्याला किसान मोर्चा जिल्हा महामंत्री साईनाथ बुरांडे, शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शहा, विकासपली सरपंच श्यामल सिकदार, उपसरपंच मिहीर विश्वास, सिमूनतला सरपंच पूर्णिमा हलदार, चपलवाडा सरपंच रेखा कोहपरे, रेगडीचे माजी सरपंच बाजीराव गावडे, सदस्य बाजीराव तलांडे, दिपाल मृद्धा, दिवाकर भट्टलवार आणि सामाजिक कार्यकर्ते गितेश कोहपरे उपस्थित होते.

विकासपली येथील या महोत्सवासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. नामकीर्तनाच्या माध्यमातून केवळ धार्मिक विधीच पार पडले नाहीत, तर सामाजिक प्रश्नांवरही चर्चा होऊन गावच्या विकासासाठी एकजुटीचा संकल्प करण्यात आला. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गावातील भजनी मंडळ व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button