
जनतेची शक्तीच मला काम करण्याची प्रेरणा देते – आमदार विनोद अग्रवाल
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते मोगर्रा येथे सुमारे १ कोटी ९० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन दिमाखात पार पडले. यामध्ये प्रामुख्याने नूतन ग्रामपंचायत भवनाचा समावेश असून, या विकासकामांमुळे मोगर्रा गावाच्या प्रगतीला नवी गती मिळाली आहे.
कार्यक्रमात ग्रामस्थांना संबोधित करताना आमदार विनोद अग्रवाल भावूक होत म्हणाले की, “मी आमदार नसतानाही या गावात येत होतो, तेव्हा येथील विकासाची अवस्था अत्यंत दयनीय होती. रस्ते आणि मूलभूत सुविधांचा अभाव होता. मात्र, जनतेने दिलेल्या संधीमुळे गेल्या पाच वर्षांत आम्ही मोगर्र्याला विकासाच्या मार्गावर आणले आहे. जनतेने मला जनसेवक म्हणून निवडले असून, लोकांची सेवा करणे हीच माझी खरी प्रेरणा आहे.”
आमदारांनी आपल्या कार्यकाळातील कामांची माहिती देताना सांगितले की, गावात केवळ भौतिक सुविधाच नाही तर सामाजिक विकासावरही भर दिला आहे. पायाभूत सुविधा: नवे ग्रामपंचायत भवन, रस्ते, वीज, पाणी, वाचनालय आणि गावातील रस्त्यांचे रुंदीकरण. सामाजिक वास्तू: महिला बचत गट भवन, कृषी गोदाम, शाळा इमारत आणि गावाचे सौंदर्यीकरण. घरकुल योजना: गेल्या १५ वर्षात केवळ ५ हजार घरकुले मंजूर झाली होती, मात्र आमच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात ४० हजार गरजूंना घरे मंजूर करून दिली आहेत. योजनांचा लाभ: ९० टक्के जनतेला रेशन योजना, तर ३६ हजार लाभार्थ्यांना निराधार व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. लोकांचे जीवन सुसह्य करणे हीच माझी जबाबदारी आहे. व्यक्तिगत शासकीय योजनांसोबतच गावाची सर्वांगीण उन्नती हेच आमचे ध्येय असल्याचे आमदार अग्रवाल म्हणाले.
या सोहळ्याला पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, सोनुला बरेले, सरपंच रिता लिल्हारे, उपसरपंच दिलीपसिंह मुंडेले यांच्यासह सुजीत येवले, ओमकार नागपुरे, अनिताबाई नेवरे, मोतीराम नैकाने, अनिल कुसराम, अनिल नागपुरे, अनुसया गुरबेले, सुनिताबाई नागपुरे, तिलकचंद घोरमारे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



