क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

सिरोंचा उपविभागात अवैध रेती माफियांवर प्रशासनाची धडक कारवाई ; १५ हजार ६६५ ब्रास अवैध रेतीसाठा जप्त

दंड म्हणून २९ कोटी ३६ लाखांची रक्कम प्रस्तावित

गडचिरोली: सिरोंचा उपविभागात अवैध रेती तस्करीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १५ हजार ६६५ ब्रास अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला असून, संबंधित व्यावसायिकांवर २९ कोटी ३६ लाख रुपयांचा अंदाजित दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी अंकिसा माल, चिंतरेवला आणि मद्दीकुंठा येथे विशेष तपासणी मोहीम राबवली. अंकिसा माल येथे तपासणीदरम्यान रेती साठ्यात ६४ ब्रास आणि ५९ ब्रासची तफावत (कमी साठा) आढळली, या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू आहे. मद्दीकुंठा येथील सर्व्हे नंबर ५३३ मध्ये परवानगी असलेल्या ठिकाणी भेट दिली असता, रेतीसाठा चक्क दुसऱ्याच (सर्व्हे नंबर ३५६) जागेवर असल्याचे आढळले. मोजमाप अहवालानुसार, या ठिकाणी एकूण १५ हजार ६६५ ब्रास रेतीसाठा दिसून आला.

साठवणूक आणि वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना उपलब्ध नसल्यामुळे, हा प्रचंड साठा अवैध घोषित करून जप्त करण्यात आला. याशिवाय गौण खनिज उत्खननासाठी वापरलेली २ जेसीबी मशीन, १ पोकलँड मशीन आणि ५ ट्रक ही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. तहसीलदार, सिरोंचा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर केला आहे. जप्त केलेल्या १५,६६५ ब्रास अवैध साठ्यासाठी प्रति ब्रास ₹ १८,६०० दंड (पेनल्टी) प्रमाणे एकूण अंदाजित रक्कम २९ कोटी ३६ लाख ५६ हजार ८०० रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणात चौकशी सुरू असून, अंतिम सुनावणी आणि अपीलाच्या अधीन राहून दंडाची रक्कम निश्चित होईल, असे सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button