
हिवताप व डेंग्यू रोखण्यासाठी अनोखा उपक्रम ; दिवाळीसाठी आलेल्या १५४८ मजुरांची रक्त तपासणी
गोंदिया: जंगलव्याप्त आणि अतिवृष्टीमुळे पाण्याचे डबके साचलेल्या गोंदिया जिल्ह्यात हिवताप (मलेरिया) आणि डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या कल्पक विचारातून “एक गाव, एक दिवस” या विशेष सर्वेक्षण मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दि. ७ ते १८ ऑक्टोबर या ११ दिवसांच्या कालावधीत आरोग्य विभागाने जिल्ह्यातील १०३५ गावांमध्ये जनजागृती करत तब्बल ५ लाख ९८ हजार ५०७ कंटेनरची तपासणी केली.
जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत डेंग्यू व हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ होते. स्थलांतरित मजूर सणासुदीला गावात परत आल्याने लागण वाढण्याची शक्यता असते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांनी २ लाख ६१ हजार ९२३ घरांना भेट देऊन डास अळी सर्वेक्षण केले. यात ४७९६ दूषित घरांमध्ये ५८६९ कंटेनरमध्ये डास अळी आढळल्या. दिवाळीसाठी बाहेरगावाहून स्वगावी आलेल्या १५४८ मजुरांची जलद ताप तपासणी किट (RDK) ने रक्त तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. अभियानादरम्यान १०८७ डासोत्पत्ती स्थानकांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. तसेच १०३५ गावांमध्ये कोरडा दिवस पाळून जनजागृती करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी या अभियानात ग्रामपंचायत, गावकरी आणि पदाधिकारी यांना एकत्रित सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी माहिती दिली की, साचलेल्या पाण्याची भांडी झाकून ठेवणे, पाण्याचा निचरा करणे आणि ‘डी-लार्व्हा फवारणी’ करणे या उपायांमुळे डासांची उत्पत्ती थांबवून आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.



