
विद्यार्थ्यांना आदिवासी पारंपारिक जीवनशैलीची आणि ग्रामसभा सक्षमीकरणाची ओळख
गडचिरोली : विद्यार्थी केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक वास्तव आणि लोकशाहीच्या मूलभूत स्तराचा अभ्यास करावा, या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक इंग्रजी विभाग वआदिवासी अध्यासन केंद्राच्यावतीने ‘अनुभूती’ कम्युनिटी आउटरिच प्रोग्राम’चे तिसरे पर्व नुकतेच पार पडले. गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या कोरची तालुक्यातील पड्यालजोब या गावाला अभ्यास भेट देऊन विद्यार्थ्यांनी ‘मावा नाटे, मावा सरकार’चा या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
ग्रामसभेच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून जलसंवर्धन, पारंपरिक मत्स्य व्यवसाय व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःच्या श्रमातून बांध निर्माण केला आहे. गोंडी भाषेत ‘उस्माल गाटूम’ म्हटल्या जाणाऱ्या या अभिनव प्रकल्पाची माहिती. जोहान पोरेटी यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी या स्थळाला गावातील लोकांसह प्रत्यक्ष भेट देऊन लोकसहभागातून होणाऱ्या शाश्वत विकासाचे मॉडेल समजून घेतले. पड्यालजोब ग्रामसभेने वनहक्क कायदा २००६ अंतर्गत मिळालेल्या सामुदायिक वनहक्कांचा वापर करून शाश्वत विकासाचा एक आदर्श वस्तुपाठ मांडला आहे. ‘मनरेगा’ ची यशस्वी अंमलबजावणी व १० वर्षांचा सविस्तर वनकार्य आराखडा तयार करून ग्रामसभेने पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासाची सांगड घातली आहे. सामूहिक प्रयत्नांतून पड्यालजोबने निसर्गाचे रक्षण करत आर्थिक स्वावलंबन साध्य केले असून हे मॉडेल इतर गावांच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरत आहे. याप्रसंगी कोरची तालुका महाग्रामसभेचे अध्यक्ष राजाराम नैताम यांनी महाग्रामसभेची रचना, तिचे अधिकार आणि कार्यपद्धती यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोकशाहीमध्ये ग्रामसभेचे महत्त्व आणि आदिवासी समुदायाची स्वायत्त निर्णयप्रक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी जाणून घेतली यावेळेस पड्यालजोब ग्रामसभा अध्यक्ष महारु पोरेटी, सचिव मदन पोरेटी व युवक वर्ग उपस्थित होते.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी विद्यार्थ्यांनी रेला पारंपरिक नृत्याचे बारकावे समजून घेत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आदिवासी पारंपारिक जीवनशैलीची आणि प्रशासकीय स्वायत्ततेची नवी ओळख झाली. या ‘अनुभूती’ उपक्रमाचे यशस्वी आयोजन इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. विवेक जोशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. वैभव मसराम, सह-समन्वयक डॉ. प्रमोद जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी कार्यालयीन कर्मचारी योगिता कुंभारे यांच्यासह पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



