
भंडारा, तुमसर, पवनी मतदारसंघात मतदान ; कार्यालये, बँका आणि सार्वजनिक उपक्रमांना सुट्टी लागू
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि पवनी या नगरपालिका निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने, मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळवल्यानुसार, ज्या मतदारसंघात मतदान होत आहे, त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाची सुविधा पुरविण्यासाठी त्या क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सार्वजनिक सुट्टी लागू राहील. संबंधित नगरपालिका क्षेत्रातील शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींनाही ही सुट्टी लागू असेल.
ही सुट्टी केवळ मतदानासंदर्भातील कामकाजासाठी जाहीर करण्यात आली आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



