मंचावर तबल्यावर थाप मारली, मित्रांसोबत जेवण केले आणि २० मिनिटांतच ‘जीवनयात्रा’ संपविली

एकलव्य निवासी शाळेतील अकरावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; प्रवेशोत्सवाच्या आनंदावर विरजण; चामोर्शी तालुक्यात हळहळ
गडचिरोली : ज्या हातांनी काही मिनिटांपूर्वी शाळेच्या प्रवेशोत्सवात तबल्यावर चैतन्याची थाप मारली, ज्याच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात न्हाऊन निघाले, त्याच विद्यार्थ्याने अवघ्या २० मिनिटांत मृत्यूला कवटाळल्याची सुन्न करणारी घटना गडचिरोलीत घडली आहे. शहरातील सेमाना मार्गावरील एकलव्य निवासी मॉडेल स्कूलमधील अकरावीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीतच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम (१७, रा. शांतीनगर, ता. चामोर्शी) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
सोमवारी ३० मार्च रोजी या नामांकित शासकीय आश्रमशाळेत नवीन शैक्षणिक सत्राचा ‘प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होत होता. नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत, फुलांच्या माळा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन अशा चैतन्यमय वातावरणात प्रिन्स अत्यंत आनंदी दिसत होता. तो एक उत्तम तबलावादक होता. कार्यक्रमात त्याने केलेल्या बहारदार तबलावादनाने उपस्थित शिक्षक आणि पाहुणे मंत्रमुग्ध झाले होते. सादरीकरणानंतर त्याचे सर्वत्र कौतुक झाले आणि त्याने नेहमीप्रमाणे मित्रांसोबत हास्यविनोद करत दुपारचे जेवणही केले. मात्र, या हसऱ्या चेहऱ्यामागे मृत्यूचे सावट दडलेले असेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.
जेवण आटोपल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत प्रिन्स अचानक गायब झाला. शोध घेतला असता, शाळेच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत त्याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. काही क्षणांपूर्वी मंचावर कलेचा आविष्कार करणारा आपला सहकारी अशा अवस्थेत पाहून इतर विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. विशेष म्हणजे, प्रिन्सची लहान बहीणही याच शाळेत इयत्ता सहावीत शिक्षण घेत असून, या घटनेने तिला आणि सहकाऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.
सर्वांसोबत आनंदाने वागणारा विद्यार्थी अवघ्या २० मिनिटांत इतका कठोर निर्णय कसा घेऊ शकतो? त्याच्यावर अभ्यासाचे दडपण होते की खासगी आयुष्यात काही घडामोडी घडत होत्या? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याचा (Mental Health) प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका उमद्या विद्यार्थ्याने आणि उदयोन्मुख कलाकाराने अशा प्रकारे जगाचा निरोप घेतल्याने गडचिरोली शहरासह चामोर्शी तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस आता त्याचे मित्र आणि शिक्षकांची चौकशी करत असून आत्महत्येचे हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.



