अखेर खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल

भंडारा : शहरातील मुख्य रोडवरील एक रोड म्हणजे मुस्लीम लायब्ररी चौक मधील रोड. या रोडवर गेल्या वर्षभरापासून अनेक खड्डे पडल्या नंतर देखील माजी खासदार व आमदार यांनी खड्डयाकडे लक्ष न देता फक्त आपल्या राजकीय कामात व्यस्त असल्याने या रोडवर वर्षभरात अनेक युवक व वृध्द अपघात होवून जखमी झाले आहेत. अनेक नागरीक जखमी झाले असले तरी देखील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा या खड्ड्याची दखल घेत नसल्यामुळे या खड्ड्याकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी मुस्लिम लायब्ररी चौकासमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर चक्क रांगोळी काढत खड्ड्यातच बसून गांधीगिरी करत हे नवखे एल्गार पुकारुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.
याच आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत लोकसभा निवडणूकी करीता लागलेली आचारसंहिता संपताच रोडच्या कामाला लागले असल्याने अनेक वर्षापासून फुटलेले रोड आता गुळगूळीत होत असल्याचे पाहुन सामान्य नागरीकांनी अजय मेश्राम यांनी खड्डयात बसुन केलेल्या आंदोलनाची दखल घेतली याचे समाधान व्यक्त केले. त्यांना शहरातील अनेक समस्याकडे लक्ष केंद्रीत करत समान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचे देखील नागरीकांनी सुचना केल्या.



