
१२ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई
गोंदिया : गोंदिया शहर आणि रामनगर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड संदेश मधुकर खोब्रागडे (४५, रा. कुडवा) याला अखेर महाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एम.पी.डी.ए.) एक वर्षासाठी वाशिम येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. जिल्हा दंडाधिकारी प्रजित नायर यांनी गुरुवारी (२८ ऑगस्ट) हे आदेश दिले.
खोब्रागडे याच्यावर रामनगर आणि शहर पोलिस ठाण्यांत एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात शारीरिक हल्ला, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि अवैध शस्त्र बाळगण्याचा समावेश आहे. तो रात्री-अपरात्री हातात घातक शस्त्रे घेऊन कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना धमकावत असे. त्याच्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळोवेळी त्याच्यावर गुन्हे दाखल केले आणि प्रतिबंधक कारवायाही केल्या. मात्र, त्याने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सुरूच ठेवली. त्यामुळे अखेर जिल्हा पोलिस प्रशासनाने एम.पी.डी.ए. अधिनियम १९८१ (सुधारित २०१५) अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी नायर यांनी गांभीर्याने विचार करून खोब्रागडेला ‘धोकादायक व्यक्ती’ म्हणून घोषित केले आणि त्याला एक वर्षासाठी वाशिम कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
या कारवाईमुळे रामनगर आणि शहर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी पोलिस प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर व साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, प्रतिबंधक सेल तसेच रामनगर पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे केली.



