गडचिरोलीविदर्भ

माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त ; ५ टन वजनाच्या लेथ मशीनसह मोठा शस्त्रसाठा जप्त

गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफची बालबेडा जंगलात संयुक्त कारवाई; जमिनीत पुरलेले घातक साहित्य जागीच नष्ट

गडचिरोली: जिल्ह्यातील माओवाद आता संपूष्टात आला असून, माओवादी चळवळ देखील जवळजवळ संपूष्टात आली आहे. सुरक्षा दलांना धोका पोहोचवण्याच्या आणि घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना मोठे यश आले आहे. २७ जून रोजी केलेल्या एका अत्यंत प्रभावी कारवाईत माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेली तब्बल ५ ते ६ टन वजनाची लेथ मशीन आणि मोठ्या प्रमाणात घातक स्फोटक निर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी २३ आणि २७ मे रोजी अशीच कारवाई करण्यात आली होती.

माओवादी आंतरराज्यीय सीमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेऊन शस्त्रे व स्फोटक साहित्य तयार करत असत आणि विविध नक्षल सप्ताह किंवा निवडणुकांच्या काळात घातपात करण्यासाठी ते जमिनीत पुरून ठेवत असत. महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी शस्त्रनिर्मितीचे साहित्य लपवून ठेवल्याची अत्यंत गोपनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळताच २६ जून रोजी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम आखण्यात आली. या मोहिमेसाठी विशेष अभियान पथक (C-60) गडचिरोली आणि प्राणहिता यांच्या संयुक्त ६ तुकड्या, बॉम्ब शोधक व नाशक पथकाची (BDDS) १ टीम आणि सीआरपीएफचे जवान अशा संयुक्त बळाला जंगलात रवाना करण्यात आले. २७ जून रोजी जवानांनी संशयास्पद परिसराला घेरा घातला. बीडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता, जमिनीत पुरलेला खालील मोठा शस्त्रसाठा आढळला. ज्यामध्ये ५ ते ६ टन वजनाची १ नग लेथ मशीन (शस्त्र बनवण्यासाठी वापरली जाणारी). १५० नग क्लेमोर माईन्स व बीजीएल (BGL) पाईप्स. २२० नग १२ बोअर बंदूक निर्मितीसाठी वापरले जाणारे पाईप्स. २० नग रायफल रॉड मेटल पट्ट्या. यांचा समावेश आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हे सर्व माओवादी साहित्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील जवानांच्या साहाय्याने घटनास्थळावरच जागीच नष्ट करण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या देखरेखीखाली पार पडली. या मोहिमेत विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता, इंटेलिजन्स सेल तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी मोहिमेत सहभागी सर्व जवानांचे विशेष कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button