गोंदियाविदर्भ

सापासोबत स्टंटबाजी जीवावर बेतली; तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील पाटीलटोला येथे गुरुवारी (१० जुलै) रात्री १० वाजण्याच्या सुमारास सापासोबत स्टंटबाजी करताना एका तरुणाला सापाने दंश केला. यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्की बागडे (३०, रा. घोगरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पाटीलटोला येथील कुंभरे यांच्या घरी साप निघाल्याची माहिती मिळताच, लक्की बागडे हा साप पकडण्यासाठी तेथे गेला. विशेष म्हणजे, त्याला साप पकडण्याचे कोणतेही अधिकृत प्रशिक्षण नव्हते. असे असूनही, लक्कीने तो साप पकडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओही काढण्यात आला आहे, ज्यात लक्कीने सापाला हातात पकडल्याचे स्पष्ट दिसत आहे. उपस्थितांनी त्याला साप सोडून देण्यास सांगितले, तरीही तो सापाला हातात धरून होता. त्याच वेळी सापाने त्याच्या अंगठ्याला चावा घेतला.

साप चावल्याने घाबरलेल्या नागरिकांनी लक्कीला तात्काळ भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. याच दरम्यान, रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अलीकडच्या काळात तरुण पिढीमध्ये सोशल मीडियावर ‘रील’ (Reel) बनवून प्रसिद्धी मिळवण्याची क्रेझ वाढली आहे. यासाठी काही तरुण धोकादायक स्टंटबाजी करत आहेत, ज्यामुळे असे अपघात घडत आहेत. अशा घटना यापूर्वीही राज्यात काही ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे, तरुणांनी प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंटबाजी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button