गडचिरोलीविदर्भ

कोठी, व्यंकटापूर येथे मोफत आरोग्य शिबिर; २०० हून अधिक नागरिकांची तपासणी

शहीद जवानांच्या शौर्याची जनजागृती आणि मोफत औषधोपचार; पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

गडचिरोली : अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा कोठी आणि उपपोस्टे व्यंकटापूर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून दुर्गम भागातील २०० हून अधिक नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार पुरविण्यात आले.

कोठी येथील आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या डॉ.छाया ऊईके (स्री रोग तज्ञ), महिला व बाल रुग्णालयाच्या डॉ.मनिषा गेडाम (बालरोग तज्ञ), पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील मडावी, डॉ.मनिष मेश्राम, शैलेश मानमोडे (फार्मसिस्ट), तसेच 113 बटा. सीआरपीएफचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक नारायण यांच्या नेतृत्वात तपासणी करण्यात आली. तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे डॉ.रविंद्र इंगोले यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी, तर डॉ.सारंग डोंगरे, डॉ.प्रांजल नागोसे यांनी नागरिकांच्या नेत्र समस्यांविषयी तपासणी केली.

कोठी येथील मेळाव्यात १०७ आणि व्यंकटापूर परिसरात सुमारे १०० नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यापैकी ३६ रुग्णांना अधिक उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये संदर्भीत (Refer) करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांची बालरोग तज्ञांकडून विशेष तपासणी करून त्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

केवळ आरोग्य तपासणीच नव्हे, तर कोठी येथील आठवडी बाजारात पोलिसांतर्फे जनजागृतीपर उपक्रमही राबविण्यात आले. जिल्ह्यासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या शौर्याबद्दल, सी-60 पथकाच्या कामगिरीबद्दल आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची (Civic Action Program) माहिती बॅनरच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली.

या शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, कमांडंट जसवीर सिंग, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., तसेच भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते आणि अहेरीचे अजय कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. कोठीचे प्रभारी अधिकारी कार्तिक दळवी आणि व्यंकटापूरचे राजू गड्डापोळ यांच्यासह पोलीस अंमलदारांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button