गडचिरोलीविदर्भ

बाम्हणी, भगवानपुर येथील महिलांपुढे अखेर नमले दारूविक्रेते

वर्षभरापासून दारूबंदी कायम

गडचिरोली : तालुक्यातील 9 किलोमिटर अंतरावर व बाम्हणी ग्रामपंचायत अंतर्गत समावेश असलेल्या बाम्हणी, भगवानपुर या दोन्ही गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी एकत्रित लढा देत जवळपास 12 विक्रेत्यांचा अवैध व्यवसाय बंद केला. विशेष म्हणजे, मुक्तीपथच्या मार्गदर्शनात महिलांनी केलेल्या कृतींपुढे दारूविक्रेत्यानी हार मानली. आता वर्षभरापासून संबंधित दोन्ही गावांमध्ये अवैध दारूविक्री बंद आहे.

बाम्हणी व भगवानपुर दोन्ही गावात दारू विक्री चालू-बंद होत राहायची. या गावात हातभट्टी, देशी, विदेशी दारू विक्री करायचे. जवळपास एकूण 12 विक्रेत्यांनी मिळून दोन्ही गावातील सामाजिक वातावरण दूषित केले होते. परिसरातील विविध गावांतील मद्यपी लोकांची दारू पिण्यासाठी सकाळ सायंकाळ गर्दी बघावयास मिळत होती. परिणामी गावात वाढलेल्या दारुच्या व्यसनामुळे  शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. युवकांचे आरोग्य, आर्थिक नुकसान, लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात दारूमुळे झगडे, भांडण होत असे.

दोन्ही गावातील अवैध दारूविक्री बाबतची परिस्थिती लक्षात घेता  बाम्हणी येथील वर्षा म्हशाखेत्री, ज्योती कुकुडकर तसेच भगवानपूर गावातून वर्षां आदे, कविता दरवडे यांच्यासह महिलांनी सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समिती यांना भेटून अवैध दारूविक्री बंद करणे गरजेचे असल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर दोन्ही गावांनी मिळून महिला सभा घेतली. यावेळी दारूबंदीचा ठराव पारित करून दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिले. एकजुटीने गावात दिवस रात्र दारू विक्रेत्यांवर पाळत ठेवली. दोन ते तीन दारू विक्रेत्यांवर पोलीस कार्यवाही सुद्धा करण्यात आली. महिलांनी एकोप्याने दारूविक्रत्यांविरोधात होणाऱ्या कृतींमध्ये सातत्य ठेवल्याने अखेर विक्रेत्यांनी हार मानली. महिलांच्या संघर्षातून तब्बल 12 विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला. आता वर्षभरापासून दारूविक्रीमुक्त गाव म्हणून दोन्ही गावे नावारूपास आले आहेत. ही दारूबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी गावात शक्तीपथ संघटना गठित करून मुक्तीपथ तालुका संघटक रेवनाथ मेश्राम व टीमकडून वेळोवेळी महिलाना मार्गदर्शन केले जात आहे. दोन्ही गावातील दारुबंदीला धक्का लागू नये याकरिता महिलांकडून विक्रेत्यांवर पाळत ठेवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button