
गोंदिया : बनावट विदेशी दारू तयार केली जात असलेल्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून हा कारखान उधळून लावला. शहरातील बाजपेयी चौकाजवळ कुंदनकुटी मागील परिसरात गुरुवारी (दि. ३०) रात्री ११:१५ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. यात पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले असून, कारखान्यातून ११ लाख पाच हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील बाजपेयी चौकाजवळील कुंदनकुटी मागील परिसरात बनावट विदेशी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने गुरुवारी (दि. ३०) रात्री ११:१५ वाजताच्या दरम्यान एका सिमेंट काँक्रिटच्या गोडाऊनमध्ये धाड घातली. येथे आरोपी पराग रमण अग्रवाल (३१, रा. स्वागत लॉनजवळ, गणेशनगर) हा बनावट दारू तयार करताना आढळला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने तत्काळ त्याला ताब्यात घेतले.
घटनास्थळी बनावट रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या १० पेट्या (किंमत २६ हजार), ५० लिटर क्षमतेचे दोन प्लास्टिक ड्रम (किंमत एक हजार), स्पिरीट भरलेले २०० लिटर क्षमतेचे दोन ड्रम (किंमत एक लाख ८० हजार), ओसीब्ल्यू कंपनीच्या ३०० रिकाम्या बाटल्या (किंमत ६०० रुपये), झाकण व पॅकिंग साहित्य (किमत एक हजार), स्पिरीट काढण्याचे मॅन्युअल मशीन (किमत अडीच हजार), प्लास्टिक पाईप (किंमत १०० रुपये), अॅल्युमिनियमचे दोन गंज (किंमत एक हजार), पॅकिंग टेप व साहित्य (किंमत १०० रुपये), १० रिकामे खोके, लाकडी हातोडी, पिण्याच्या पाण्याचे पाच कॅन (किंमत अडीच हजार), वाईन रंगाचे लिक्विड (किंमत १०० रुपये), चारचाकी वाहन (क्रमांक सीजी ०४-एनके ०७४५, किंमत आठ लाख), मोबाइल फोन (किंमत २० हजार), असा एकूण ११ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बनावट दारू तयार करण्यासाठी आरोपीने मानवी आरोग्यास व जीवितास धोका निर्माण करणारे रासायनिक पदार्थ वापरले होते, असे पोलिसांनी नमूद केले आहे. शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम १०८, ६५ (अ), ६५ (ब), ६५ (क), ६५ (ड), ६५ (ई), ६५ (एफ), ८३, भारतीय न्याय संहिता कलम १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपी पराग अग्रवाल याने कबुली दिली की, तो गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून याठिकाणी रॉयल स्टॅग आणि नावाने ओसीब्ल्यू या ब्रँडच्या बनावट विदेशी दारू तयार करून परिसरातील काही किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करीत होता. या बनावट दारू प्रकरणाची सखोल चौकशी केल्यावर आरोपीने बनावट दारूसाठी वापरलेले रासायनिक पदार्थ, स्पिरीट व फ्लेव्हर्ड कलर हे बाहेरील राज्यातून मागवत होता, असे सांगितले.



