
गडचिरोली : जिल्ह्यात आगामी नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिन उत्सव आणि संभाव्य धरणे, मोर्चे तसेच आंदोलनांची शक्यता विचारात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे.
ही जमावबंदी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते दि. ०६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये लागू राहणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार, संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय शस्त्रास्त्रे, दाहक पदार्थ, स्फोटके, दगड-क्षेपणास्त्रे बाळगणे. घोषणाबाजी, उत्तेजनात्मक भाषणे, हावभाव करणे. मिरवणुका, सभा आयोजित करणे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी गटागटाने जमणे. या कृतींना मनाई आहे.
उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, मोर्चा अथवा मिरवणूक आयोजित करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.



