
टाटा मोटर्स येथे मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि अप्रेंटिसशिपचे ३ वर्षांचे प्रशिक्षण; नोकरीचीही संधी
गडचिरोली : जिल्ह्यातील गरजू युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल, क्विझ विनिंग टुगेदर कंपनी आणि टाटा मोटर्स कंपनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कमवा व शिका’ या योजनेंतर्गत मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि अप्रेंटिसशिपसाठी १० जून रोजी २९ युवक-युवतींना प्रशिक्षणकामी टाटा मोटर्स कंपनी, पुणे येथे रवाना करण्यात आले.
टाटा मोटर्स कंपनी, पुणे येथे या युवक-युवतींना मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि अप्रेंटिसशिपचे एकूण ०३ वर्षांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत युवक-युवतींना स्टायफंड (विद्यावेतन) देखील दिले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर या युवक-युवतींना टाटा मोटर्स कंपनी, पुणे येथे नोकरी देखील मिळवून देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील गरजू आणि सुशिक्षित आदिवासी तरुण-तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. यातून त्यांना उपलब्ध होणाऱ्या रोजगारामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
गडचिरोली पोलीस दलाने आतापर्यंत रोजगार आणि स्वयंरोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून ‘पोलीस दादालोरा खिडकी’ अंतर्गत ८१०३ युवक-युवतींना रोजगार आणि ५६१४ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले आहे. यासोबतच, पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आजपर्यंत एकूण १२० वेब डेव्हलपर, १२० सॉफ्टवेअर डेव्हलपर, १५६४ युवक-युवतींना ड्रायव्हिंग, २०८ कराटे, ३०० एस.पी.सी. (स्पेशल पोलीस कॉन्स्टेबल) आणि १७०० युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण असे एकूण ३९१२ युवक-युवतींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन/उपपोलीस स्टेशन/पोलीस मदत केंद्रांचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. गडचिरोली पोलिसांचा हा ‘प्रोजेक्ट उडान’ जिल्ह्यातील तरुणाईसाठी एक आशेचा किरण ठरत आहे.



