झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह

टिकेपल्ली रस्त्यावरील घटना ; परिसरात खळबळ
गडचिरोली : आपल्याच शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आकाश अनिल माली (वय २१) रा. शांतिग्राम, ता. मुलचेरा असे त्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुलचेरा तालुक्यातील शांतिग्राम येथील २१ वर्षीय तरुण आकाश माली हा मागील दोन ते तीन दिवसांपासून शांतिग्राम वरून एक ते दीड किलोमीटरवर असलेल्या टिकेपल्ली रस्त्यावरील शेतात पाणी द्यायला जात होता. शेतातील मोटार सुरू करून पाईप बदलवून तो रात्रीच घरी परत यायचा. सोमवार, २१ ऑक्टोबरला देखील तो रात्रीच्या सुमारास शेतात पाणी द्यायला गेला होता. मात्र, रात्री तो घरी परतलाच नाही.
त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याचे वडील अनिल माली यांनी आपल्या शेतात जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना मुलगा आकाश झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. लेकाचा मृतदेहा पाहताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर गावकऱ्यांना याबाबत कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेची माहिती अहेरी पोलिसांना दिली. विशेष म्हणजे आकाशचे दोन्ही हात बांधलेले होते. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याचा संशय बळावला आहे.
आकाश हा बीएससी प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.



