गडचिरोलीविदर्भ

राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता सेवा पंधरवड्यांतर्गत चोप येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर

माजी आ. गजबे यांच्या हस्ते उद्घाटन ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग 

देसाईगंज : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि राष्ट्रनेता पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत देसाईगंज तालुक्यातील चोप येथे ३० सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान, आरोग्य तपासणी आणि आयुष्मान भारत (गोल्डन कार्ड) शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. चोप येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, गांधी चौक, यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी चोप ग्रामपंचायतचे सरपंच नितीन लाडे, गौरव नागपूरकर, भाऊराव पालांदुरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनाप्रसंगी बोलताना माजी आ. गजबे यांनी समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आदर्शाप्रमाणे आणि राष्ट्रनेता पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनुसार समाजसेवा करणे हेच खरी राष्ट्रसेवा आहे. रक्तदान हे जीवनदान देण्याचे कार्य असून, अशा उपक्रमांमुळे आरोग्य संबंधी जनजागृती होते. तसेच आयुष्मान भारत योजना ही सामान्य जनतेच्या आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीने असे उपक्रम यशस्वी करणे गरजेचे आहे.”

या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने लोकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामुळे लोकांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता निर्माण झाली. विशेष म्हणजे, आयुष्मान भारत (गोल्डन कार्ड) शिबिरात अनेक गरजू लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली, ज्यामुळे त्यांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे शुभम नागपूरकर, शेखर कुथे, विश्वा बावणे, विनोद डोंगरवार, जीवन बावणे, निलेश राऊत, तुषार उईके, विशाल डोंगरवार, शिवम नागपूरकर, किशोर भोयर, गोविंद बनपूरकर यांसह सर्व सभासदांचे कौतुक करण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. साजिद आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील ऐक्य वाढते आणि जनतेच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळते, असे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button