क्राईमगडचिरोलीविदर्भ

रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या युवतीला अमानुष मारहाण

आरमोरी येथील घटना ; दोन आरोपींना अटक

आरमोरी : क्षुल्लक कारणासाठी एका रेस्टॅारंटच्या काऊंटरवर बसलेल्या १९ वर्षीय युवतीला दोन युवकांनी बेदम मारहाण केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत बंदिस्त झाला आहे. युवतीच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. १९ ऑगस्ट रोजी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

सोहेल शेख (३०) रा. बर्डी वॉर्ड आरमोरी व अयुब शेख (३८) रा. कासार मोहल्ला आरमोरी अशी आरोपींची नावे आहेत. आरमोरी येथील वडसा पॉईंटजवळ शिवम रेस्टॉरंट आहे. मागील नऊ महिन्यांपासून १९ वर्षीय युवती या हॉटेलमध्ये काम करीत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आरोपी सोहेल व त्याची पत्नी रेस्टॉरंटमध्ये दोसा खाण्यासाठी आले. सोहेल याने पत्नीला रेस्टॉरंटमध्ये सोडून तो बाहेर कामासाठी निघून गेल्यानंतर सोहेलच्या पत्नीने युवतीस मोबाईल चार्जर मागितला, मालकाचा आदेश असल्याने मी तुम्हाला चार्जर देऊ शकत नाही, असे उत्तर युवतीने दिले. यानंतर सोहेलच्या पत्नीने तिच्याशी बाचाबाची केली.

या घटनेची माहिती तिने सोहेलला दिली. अवघ्या पाच मिनिटात आरोपी सोहेल हा रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. काउंटर बसलेल्या युवतीचे केस धरून टेबलवर तिचे जोरजोराने डोके आपटले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सोहेलने फोन करून १० ते १५ युवकांना बोलावून घेतले. यापैकी आरोपी अयुब शेखने युवतीला मारहाण केली, असे युवतीने तक्रारीत म्हटले आहे.

युवतीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी सोहेल शेख व अयुब शेख यांच्याविरोधात विनयभंग, लज्जास्पद वर्तणूक, अश्लील शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला. तेव्हापासून दोघेही आरोपी फरार होते. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त होऊ लागला. १९ ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button