गडचिरोलीविदर्भ

एटापल्ली तालुका ‘दारू व तंबाखूमुक्त’ करण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर ; तहसीलदारांचे कडक कारवाईचे निर्देश

गडचिरोली : एटापल्ली तालुक्याला व्यसनमुक्त करण्याच्या दृष्टीने तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ‘तालुका स्तरीय दारू व तंबाखूमुक्ती समन्वय समिती’ची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील अवैध दारू विक्रीवर कडक कारवाई करण्यासोबतच सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश तहसीलदार गांगुर्डे यांनी दिले.

बैठकीत बोलताना तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी स्पष्ट केले की, केवळ जनजागृती करून न थांबता आता प्रत्यक्ष कारवाईवर भर दिला जाईल. तालुक्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत आणि अंगणवाडी केंद्रे तातडीने तंबाखूमुक्त करावीत.शहरासह ग्रामीण भागात दारू विक्री करणाऱ्यांवर कडक पोलीस कारवाई करून विक्री बंद करावी. गावातील ‘गाव पाटील’ व ‘भुमया पुजारी’ यांना प्रशिक्षण देऊन त्यांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे. तंबाखू व दारूचे व्यसन असलेल्या रुग्णांना समुपदेशनासाठी ‘मुक्तीपथ व्यसन उपचार केंद्रात’ संदर्भित करण्याचे निर्देश दिले.

यावेळी शहर व ग्रामीण भागातील वॉर्डांमध्ये विशेष पथके नेमून दारू व तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न करण्यावर भर दिला. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ‘दारू व तंबाखू मुक्ती समिती’ स्थापन करून तिला सक्रिय करणे. ग्रामसेवकांनी मासिक सभेत तंबाखूच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन करावे. गाव पातळीवरील आशा वर्कर्सनी कॅन्सर (कर्करोग) नियंत्रणासाठी मार्गदर्शन करावे आणि व्यसनी रुग्णांना ‘मुक्तीपथ’ उपचार केंद्रात पाठवावे. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांचे व्यसनाबाबत समुपदेशन करून त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात संदर्भीत (Refer) करावे. अतिदुर्गम गावांमध्ये व्यसनमुक्ती’ आणि ‘मलेरिया’ जनजागृतीचे व्यापक कार्यक्रम राबवावेत. महाविद्यालयांनी ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) च्या माध्यमातून दारू व तंबाखू विरोधी कार्यक्रम आयोजित करावेत. आदी मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

सभेला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी, एकात्मिक बालविकास अधिकारी व्हि. एस. बुर्रीवार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे, कार्यालय अधीक्षक नगर पंचायत शिवाजी रसाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव आडे, समुपदेशक एस. डी. श्रीरामे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रेरणा राऊत, सामाजिक कार्यकर्ते बळवंत सुरजागडे, प्राध्यापक (NSS विभाग) डॉ. एस. डी. गुब्बावार, प्राध्यापक डॉ. स्वाती तंतरपाळे, NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश हजारे, उपकृषी अधिकारी बी. एस. परसवार, क्षेत्र समन्वयक आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था प्रवीण सिडाम, संतोष हारामी, आय.टी.आयचे प्रा. मनीष टेंभे, डी. बी. गवळी, मुक्तीपथ तालुका संघटक तथा तालुका समिती सचिव किशोर मलेवार, तालुका उपसंघटक आकाश भोयर, तालुका उपसंघटक शिबू कोकोडे उपस्थित होते.

आतापर्यंतची उल्लेखनीय कामगिरी

मुक्तीपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांनी बैठकीत अहवाल सादर करताना सांगितले की, पोलीस विभागाच्या मदतीने २९ ठिकाणी धाडी टाकून दारूसाठा नष्ट करण्यात आला आहे. ९३ शाळांमधील ५७४२ विद्यार्थ्यांनी जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेतला. ७५ गावांमध्ये गाव मुक्तिपथ शक्तिपथ स्त्री संघटना बैठक कार्यक्रमात  महिलाना कमजोरी, व्यसनाचे दुष्परिणाम सांगून ३७८५ महिलांना टॉनिकचे गोळ्या देण्यात आल्या. मुक्तिपथ शक्तिपथ संघटनांच्या माध्यमातून दारूवर अहिंसक कृती करण्यात आली, तर ४३ गावांत मलेरिया जनजागृती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button