दुर्गम भागातील २६ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध

गडचिरोलीच्या २५० शाळांमध्ये ह्युंदाई मोटर्सचा ‘प्रोजेक्ट H2OPE’ यशस्वी ; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ह्युंदाई मोटरच्या ‘प्रोजेक्ट H2OPE’ (होप) उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील २५० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू झाली आहे, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणात सकारात्मक सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
गडचिरोली हा आकांक्षित जिल्हा असल्याने, येथील दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस होता. त्यांच्या या दूरदृष्टीतून आलेल्या आवाहनाला ह्युंदाईने प्रतिसाद दिला. ह्युंदाईच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांतर्गत सामाजिक कल्याण आणि सामुदायिक विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या पुढाऱ्याचे अभिनंदन करीत, या उपक्रमाचा अधिक विस्तार व्हावा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
हा उपक्रम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात आला आहे. मागील वर्षी पहिल्या टप्प्यात १०० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात, यावर्षी अहेरी तालुक्यात ३५, भामरागडमध्ये १४, धानोरात ३२, एटापल्लीत ३९, कोरचीमध्ये १४ आणि मुलचेरा तालुक्यात १६ अशा एकूण १५० शाळांमध्ये ही सुविधा मिळाली आहे. या प्रकल्पातून गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २६,३४१ विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड ही एक आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी असून, ती शाश्वत विकासासाठी कटिबद्ध आहे. या कंपनीने जलसंवर्धनासाठी ‘Project H2OPE अंतर्गत सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या सुविधा वाढवणे’ ही उपक्रमात्मक योजना गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये राबवली आहे. हा उपक्रम विशेषतः ग्रामीण भागातील शासकीय शाळांमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १०० शाळा आणि दुसऱ्या टप्प्यात १५० शाळांची निवड करण्यात आली. या निवडलेल्या शाळांमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) युनिट्स, जलशीतक (वॉटर कूलर), सबमर्सिबल पंप, बोअरवेल्स आणि सहा थरांची साठवण टाकी (सिक्स लेयर स्टोरेज टँक) बसवण्यात आली आहे. त्याचबरोबर, जलसंवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती सत्रेही विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. ह्युंदाईने सीएसव्ही (CSV – Creating Shared Value) धोरणांतर्गत या प्रकल्पासाठी एकूण ५.५ कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल.



