गडचिरोलीविदर्भ

‘स्थानिक कंत्राटदारांच्या पोटावर पाय मारू नका!’- संतोष ताटीकोंडावार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

५०० कोटींच्या कामांमध्ये बाहेरील कंपनीला प्राधान्य दिल्याचा आरोप ; उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी मिळालेल्या ५०० कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांच्या निविदा प्रक्रियेत स्थानिक कंत्राटदारांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, एका विशिष्ट बाहेरील कंपनीला कामे देण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा (PWD) डाव असल्याचा दावा केला आहे.

गडचिरोली हा आदिवासी व मागासलेला जिल्हा असून, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. यावर्षी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विशेष निधीतून जिल्ह्याला ५०० कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम व इतर विभागामार्फत रस्ते, पूल व इतर विकासात्मक कामांसाठी दिला आहे. या निधीसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत स्थानिक कंत्राटदारांनी नेहमीप्रमाणे सहभाग घेतला आणि आवश्यक ती कागदपत्रे व अटी-शर्ती पूर्ण करून निविदा सादर केल्या. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक कंत्राटदारांच्या निविदा प्रक्रियेत किरकोळ त्रुटी काढून, कोणतीही लिखित सूचना न देता त्यांना प्रक्रियेतून वगळले असल्याचा आरोप ताटीकोंडावार यांनी केला आहे. यामुळे एका विशिष्ट कंपनीला ५०० कोटी रुपयांची विविध कामे देण्याचा डाव असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विकासात्मक कामांमध्ये स्थानिक कंत्राटदारांना सादर केलेल्या निविदेत कोणतीही त्रुटी काढली जात नव्हती, किंवा त्रुटींचे निवारण करून त्यांना कंत्राट दिले जात होते. परंतु, आता जिल्ह्याच्या विकासासाठी आलेल्या निधीतून होणाऱ्या कामांमध्ये स्थानिक कंत्राटदारांना जाणूनबुजून डावलले जात असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर गदा येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

संतोष ताटीकोंडावार यांनी, “जिल्ह्यातील कंत्राटदारांच्या पोटावर पाय मारू नये,” अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जर जिल्ह्यातील कंत्राटदारांवर असा अन्याय झाला, तर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल, तसेच उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ, नागपूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button