
मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांचा यशस्वी संघर्ष; गावात व्यसन घटले, विकासात्मक बाबींना मिळाली गती
गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरची तालुक्यातील सावली या छोट्याशा गावाने एक मोठा सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. या गावातील ग्रामस्थांनी मागील ११ वर्षांपासून संघर्ष करीत आपल्या गावातून अवैध दारूविक्री पूर्णतः बंद केली आहे. गावात व्यसनाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले असून, ग्रामस्थ आता एकोप्याने विकासात्मक बाबींवर विशेष लक्ष देत आहेत.
सावली या ३५० लोकसंख्या असलेल्या गावात पूर्वी अवैध दारूविक्री सुरू असल्याने शांतता, सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी अडथळे निर्माण होत होते. युवकांमध्ये वाढलेले व्यसन आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन दारूविक्री बंदी गरजेची झाली होती. यासाठी ग्रामसभेचे अध्यक्ष रूपेश कुंभरे, रेखापाल नैताम, प्रभुदास कुंभरे, अशोक मेश्राम, शांतीलाल नैताम (पोलिस पाटील) यांच्यासह ग्रामस्थांनी दारूविक्री थांबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अवैध व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात मुक्तिपथ टीमच्या मार्गदर्शनाखाली अहिंसक कृती कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये पोलीस विभागानेही वेळोवेळी सहकार्य केले.
सततच्या प्रयत्नांमुळे मागील ११ वर्षांपासून गावात दारूविक्री बंदी कायम आहे. गावात अवैध दारूविक्री होत नसल्याने एकोप्याने गावच्या विकासासाठी निर्णय घेतले जातात. दारू पिणाऱ्यांच्या संख्येत घट झाली असून, व्यसनाचे दुष्परिणाम असलेल्या रुग्णांसाठी गावातच व्यसन उपचार शिबिराच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सावली गावाचा हा निर्णय लोकहितार्थ ठरला असून, गावात कायम शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी गावातील पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि गाव संघटनेच्या महिलांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मुक्तिपथने इतरही गावांना सावली गावाच्या या कार्याची दखल घेऊन आपले गाव दारूविक्रीमुक्त करण्याचे आवाहन केले आहे.



