गडचिरोलीविदर्भ

थॅलेसेमिया मुक्तीसाठी विवाहपूर्व तपासणी काळाची गरज – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘थॅलेसेमिया सप्ताह‘ कार्यक्रमाचे उद्घाटन व शपथ ग्रहण

​गडचिरोली : “थॅलेसेमिया हा एक गंभीर अनुवांशिक आजार आहे, परंतु योग्य जनजागृती आणि खबरदारी घेतल्यास आपण यापासून समाजाला मुक्त करू शकतो. भविष्यात थॅलेसेमियाग्रस्त (मेजर) बालके जन्माला येऊ नयेत, यासाठी युवक-युवतींनी विवाह करण्यापूर्वी आपली थॅलेसेमिया तपासणी करणे अनिवार्य आहे. जर थॅलेसेमिया वाहक व्यक्तींनी विवाह टाळले, तर थॅलेसेमियावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे,” असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी केले.

​जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे १ मे ते ८ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘थॅलेसेमिया सप्ताह’ कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय उद्घाटन प्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या मोहिमेचे घोषवाक्य “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” असे आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी थॅलेसेमिया निर्मूलनासाठी व जनजागृतीसाठी सामुदायिक शपथ घेतली.

​या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, मार्गदर्शक म्हणून डॉ. इंद्रजित नागदेवते, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बगराज धुर्वे, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. साखरे (BTO) आणि डॉ. गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

​कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. इंद्रजित नागदेवते यांनी थॅलेसेमिया आजाराची सखोल तांत्रिक माहिती दिली. डॉ. बगराज धुर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “थॅलेसेमिया निदानासाठी HPLC टेस्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या आजाराने पीडित रुग्णांनी दर महिन्याला LFT, KFT, HB आणि CBC यांसारख्या चाचण्या करून नियमित उपचार घ्यावेत.”

​जिल्हा सिकलसेल समन्वयकांनी आठवडाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा सादर केली. डॉ. वर्षा लहाडे यांनी शेवटी आवाहन केले की, १ ते ४० वयोगटातील सर्व व्यक्तींनी आपली थॅलेसेमिया तपासणी करून घ्यावी, जेणेकरून जिल्हा थॅलेसेमिया मुक्त करण्याच्या दिशेने आपण खंबीर पाऊल टाकू शकू. या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button