भंडाराविदर्भ

बस रिव्हर्स घेताना बाप-लेक चाकाखाली चिरडले; अडीच वर्षाच्या चिमुरड्यासह वडिलांचा जागीच मृत्यू

पाण्याच्या कॅन घेण्यासाठी गेले होते डेपोत; संतप्त नागरिकांच्या गर्दीमुळे डेपो परिसरात तणाव, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

भंडारा : भंडारा शहरात काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत भीषण दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी एसटी डेपोमध्ये घडली. दुरुस्तीसाठी आलेली बस रिव्हर्स घेत असताना बसच्या मागील चाकाखाली चिरडले जाऊन अडीच वर्षाचा चिमुरडा आणि त्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण भंडारा शहरात शोककळा पसरली असून एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे.

भंडारा शहरातील चांदणी चौकातील रहिवासी रोहित खेडकर (३५) हे मागील सात वर्षांपासून ‘आरओ’ पाण्याचा व्यवसाय करत होते. एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांना ते रोज पिण्याचे पाणी पुरवत असत. शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या अडीच वर्षाच्या मुलासह, रौणक याला सोबत घेऊन रिकाम्या कॅन गोळा करण्यासाठी दुचाकीने डेपोमध्ये गेले होते.

त्यावेळी डेपोत दुरुस्तीसाठी आलेली एक बस चालक रिव्हर्स घेत होता. रोहित आणि रौणक हे बसच्या मागे उभे असताना चालकाला त्यांचा अंदाज आला नाही. क्षणात बसचे मागचे चाक रौणकवर चढले. आपल्या काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी रोहित यांनी झेप घेतली, मात्र दुर्दैवाने ते सुद्धा बसच्या चाकाखाली आले. या भीषण अपघातात दोघांच्याही डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

अपघाताची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच शेकडोच्या संख्येने संतप्त नागरिकांनी एसटी डेपोकडे धाव घेतली. आपल्या डोळ्यादेखत एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाल्याने नागरिक प्रचंड आक्रमक झाले होते. “चालकाला आमच्या ताब्यात द्या,” अशी मागणी करत जमावाने डेपोला वेढा घातला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि डेपोच्या मुख्य प्रवेशद्वारावर तगडा बंदोबस्त तैनात केला.

पोलिसांनी मृतांचे देह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले असून चालकाला सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे एसटी डेपोमधील सुरक्षिततेच्या नियमांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी बस रिव्हर्स घेताना मदतनीस (क्लीनर) का नव्हता? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भंडारा शहरातील एका कष्टकरी तरुणाचा आणि त्याच्या निरागस बालकाचा अशा प्रकारे अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button