भंडाराविदर्भ

दीनदयाळ जन आजीविका योजनेअंतर्गत सीएलएफ–सीएलसी वार्षिक सभा व लोककल्याण मेळावा उत्साहात

बचत गटांना १९ लाख रुपयांचा अर्थसहाय्य निधी वाटप; ९०० हून अधिक महिलांचा सक्रिय सहभाग

भंडारा : भंडारा नगर परिषदेतर्फे दीनदयाळ जन आजीविका योजनेअंतर्गत सीएलएफ – सीएलसी वार्षिक सर्वसाधारण सभा व लोककल्याण मेळावा लक्ष्मी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. महिला सक्षमीकरणावर आधारित या मेळाव्यात शहरातील ९०० हून अधिक महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात शहरातील बचत गटांना एकूण १९ लाख रुपयांचा अर्थसहाय्य निधी वितरित करण्यात आला. तसेच, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत निवड झालेल्या १३ लाभार्थ्यांना प्रत्येकी ५०-५० हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. एकूण ६५ लाभार्थ्यांना २१ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला.

पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ते म्हणाले, “बचत गट ही महिला सक्षमीकरणाची महत्त्वाची कडी असून, यामुळे महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. महिलांचा नियोजनबद्ध दृष्टीकोन कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचा ठरत आहे.”

भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, शहरातील ८५० बचत गटांच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील महिला स्वयंरोजगारात उतरल्या आहेत आणि त्यांचे कर्ज परतफेडीचे प्रमाण १०० टक्के आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव यांनी बचत गटांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे नमूद केले. निवासी उपजिल्हाधिकारी लीना फडके यांनी महिलांना उत्पादित वस्तूंच्या गुणवत्तेकडे आणि आकर्षक पॅकेजिंगकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

या मेळाव्यातून महिलांना स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button