
ग्रामसभेत महत्त्वाचे ठराव पारित ; दारू विक्रेत्यांवर बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चिंगली येथील ग्रामस्थांनी गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत दारूविक्रेत्यांवर बहिष्कार घालण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामुळे गावात पुन्हा एकदा दारूबंदी यशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गावात चोरी-छुपे दारूविक्री होत असल्याने कुटुंबांमध्ये भांडणे होत होती आणि तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन शिक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. यामुळे ग्राम संघटनेने गावातून दारूबंदी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी जनजागृती रॅलीही काढण्यात आली होती.
दारूविक्री सुरूच असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी एक विशेष ग्रामसभा आयोजित केली. या सभेत सर्वानुमते दारूबंदीचा ठराव पारित करण्यात आला आणि त्याचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये दाखले मिळणार नाहीत: गावात जो कोणी दारूची विक्री करेल, त्याला ग्रामपंचायतीकडून कोणतेही दाखले दिले जाणार नाहीत. ५०,००० रुपयांचा दंड: दारूविक्री करणाऱ्या व्यक्तीला ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. सामाजिक बहिष्कार: दंड न भरल्यास विक्रेत्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात कोणीही सहभागी होणार नाही, त्यांच्या शेतीत मदत करणार नाही आणि त्यांच्या कुटुंबात कोणी मरण पावल्यास अंत्यविधीलाही जाणार नाही. पिणाऱ्यांवरही कारवाई: गावात दारू पिऊन भांडण करणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.
गावच्या पोलिस पाटील तनुजा तुलावी, मन्साराम तोफा आणि आनंदराव वड्डे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक व मुक्तिपथ संस्थेचे संघटक राहुल महाकुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निर्णय घेण्यात आले. या ऐतिहासिक निर्णयामुळे चिंगली गाव दारूमुक्त होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.



