
इच्छुक नवीन शेतकरी नाव नोंदणीस सुरुवात
भंडारा : रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी व योजनेची माहिती उद्योजकांपर्यंत पोहचवण्याकरीता रेशीम रथाला निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो स्मिता बेलपत्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात हिरवी झेंडी दाखविली. 2017-18 पासून राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. सन 2025 मध्ये तूती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी 9 जानेवारी, ते 09 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे.
भंडारा जिल्हयात प्रामुख्याने टसर रेशीम उद्योग केला जातो. तसेच काही प्रमाणात तूती रेशीम उद्योग केला जातो. महारेशीम अभियान अंतर्गत जिल्हयातील शेतकऱ्यांना तूती व टसर रेशीम उद्योगाची माहिती देणेकरीता एक रेशीम रथ तयार करण्यात आला असून सदर रथाच्या माध्यमातून जिल्हयातील तूती व टसर रेशीम उत्पादक गावाच्या परीसरातील गावात माहिती सभा घेऊन देणार आहे. त्याकरीता तयार केलेल्या रथाला निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी अधिक्षक रोहिनी पाठराबे, रेशीम विकास अधिकारी अनिलकुमार ढोले, सहा. माहिती अधिकारी विजय जाधव, सहा. नियोजन अधिकारी योगेश भोंगाडे, , तांत्रीक अधिकारी कुमुदिनी बोरकर, जिल्हा सल्लागार अजय आटे तसेच जिल्हा रेशीम कार्यालय येथील जे. बी. सरादे, पी. ए. गुरूमुखी, पी. आर. भुजाडे, आर. एम. लोहारे उपस्थित होते.
रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. जिल्हयातील हवामान या उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन करण्यास जिल्हयात भरपुर वाव आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांचा आर्थिक स्तर व जिवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग आहे; परंतु शेतकऱ्यांना उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे जिल्हयातील शेतकरी मोठ्या संख्येने या उद्योगाकडे वळलेले नाहीत. या पृष्ठभूमीवर व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आणि तुती लागवड करण्यासाठी तसेच टसर रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या शेतक-यांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने राज्यात महारेशीम अभियान राबविले जाते. यावर्षात सदर अभियान 09 जानेवारी 2025 ते 09 फेब्रुवारी 2025 या कालावधीत भंडारा जिल्हयासह संपुर्ण राज्यात राबविले जाणार आहे.
तूती रेशीम उदयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना तूती लागवड, किटक संगोपन साहित्य व किटक संगोपन गृहाकरीता मनरेगा योजनेअंतर्गत 3 वर्षात 895 मनुष्य दिवस मजुरी व साहित्य मिळून एकूण 4,18,815/-रूपये अनुदान व सिल्क समग्र योजने अंतर्गत 75% अनुदानावर योजना उपलब्ध आहे. तसेच व्यक्तीगत जमिनीवर टसर रेशीम उदयोगाची खादय वृक्ष ऐन व अर्जुन वृक्षाची 1 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी मनरेगा योजने अंतर्गत 4 वर्षात 783 मनुष्य दिवस मजुरी व साहित्य मिळून एकूण 2,73,372/- रूपये अनुदान उपलब्ध आहे.
महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती म्हणजे काय, या शेतीचे महत्व, बाजारपेठेची उपलब्धता, रेशीम उद्योगाकरीता असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून रेशीम उद्योगाकरीता इच्छुक लाभार्थ्यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. तेव्हा शेतक-यांनी नाव नोंदणी करीता सदर कालावधीत जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा मदान निवास, डोकरीमारे हॉस्पीटल जवळ, राजीव गांधी चौक, भंडारा कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी अनिलकुमार ढोले यांनी केले आहे.



