
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मोदुनतुर्रा येथे तरुण पिढीच्या पुढाकारातून सामाजिक परिवर्तनाचे एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. गावात आयोजित करण्यात आलेल्या विशेष गावसभेत, गावकऱ्यांनी एकमताने दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मोदुनतुर्रा येथील गावसभेत मुक्तिपथचे नंदिनी आशा यांनी दारूमुळे होणारे कौटुंबिक कलह, आर्थिक नुकसान आणि तरुणांच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अवैध दारूविक्री विरोधात लढा देण्यासाठी गठित युवा संघटनेच्या सदस्यांसह महिलांनी व्यसनाधीनतेमुळे गावाचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली. या चर्चेअंती, गावाला व्यसनमुक्त करण्यासाठी दारूविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
गावात सध्या चार व्यक्तींकडून दारूची विक्री केली जात होती. या बैठकीत त्या चारी विक्रेत्यांना पाचारण करण्यात आले. गावकरी आणि युवा संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, या चारही विक्रेत्यांनी आजपासून दारूविक्री करणार नाही, असे जाहीर केले. तसेच, सर्व गावकऱ्यांसमोर तसे लेखी हमीपत्र लिहून दिले. हा निर्णय केवळ कागदावर राहू नये, यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. गावात यापुढे जो कोणी दारूविक्री करताना आढळेल, त्याला २० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. हा निर्णय अधिकृत करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसा रीतसर ठराव घेण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले.
या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी प्राजक्ता खेरकर, तुळशीराम आईलवार आणि ‘स्पार्क’चे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सचिन सडमेक, अर्जुन कोरेत, पवन आलाम, आशिक मानकर, गंगाधर कोरेत, विनोद आलाम, अतुल पानेम, दिलीप पानेम, भुमेश कोरेत, गुरुदास आलाम, अजय कोरेत, अभिषेक आलाम, शैलेश आलाम, नागेश्वर आलाम, आफताब आलाम, पुष्कर भेरेवार, देवाशिष मज्जरवार, पुछाराम पानेम, शंकर चालुरकर, गंगाधर कोरेत, राजू सोयाय, प्रमोद आलाम, अजय सडमेक, मोहन मज्जरवार, आशिक मानकर, विनोद आलाम, पवन आलाम, उर्मिला आलाम आशा वर्कर, अर्चना सडमेक, शशिकला तावाडे, छाया वाघाडे, राजुबाई तावाडे, देवी दुर्गे, कल्पना तावाडे, शोभा आलाम, माहतबाई सडमेक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



