
झाडावर चढून वाचविले प्राण ; खासगी रूग्णालयात उपचार सुरु
पालांदूर : शेळ्यांसाठी चारा आणण्याकरिता जंगलात गेलेल्या तरुणावर अस्वलाने हल्ला केला. यात त्याच्या शरीरावर खोल जखमा झाल्या आहेत. ही घटना देवरी/हमेशा कक्ष क्रमांक २१३ संरक्षित वन येथे सोमवारी सकाळी ७:३० वाजेदरम्यान घडली. सुरेश घनश्याम बोरकर (वय ३४) रा. वाकल, ता. लाखनी असे जखमी शेळी पालकाचे नाव आहे. प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारार्थ खासगी रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले आहे.
रोजच्याप्रमाणे सुरेश सकाळीच शेळ्यांना चारा आणण्याकरिता देवरी जंगलात पोहोचला. लहान फांद्या तोडण्यात व्यस्त असतानाच झुडपाच्या आत असलेले अस्वल सुरेशला दिसले नाही. यात मागून अस्वलाने हल्ला चढविला, सुरेशने झाडाच्या मोठ्या फांदीला धरून चढण्याचा प्रयत्न केला. थोड्यादूर चढला. मात्र पाय त्याचे जमिनीकडे लोंबकळत असल्याने अस्वल पुढच्या पायावर उभे होऊन सुरेशच्या दोन्ही पायांवर त्याने हल्ला केला. सुरेश दणक्यात खाली कोसळला. दोघांचीही जमिनीवर हाणामारी झाली. यात अस्वलाने शरीरावर हल्ला करीत सुरेशला गंभीर जखमी केले. सुरेशने अस्वलाला हाकलण्याकरिता बरेच प्रयत्न केले. त्यानंतर जवळच्या झाडावर सुरेश चढून राहिला. थोड्यावेळाने अस्वल जंगलात पसार झाला. वनविभागाने तत्काळ जखमीला आर्थिक मदत करण्याची मागणी गाववासीयांनी केली आहे.
दरम्यान उपवनसंरक्षकांच्या आदेशान्वये सुरेशला १० हजार रुपयांची तत्काळ मदत करण्यात आली आहे. सध्या सुरेशवर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
घटनेच्या ठिकाणी सुरेश एकटाच होता. अस्वलाने गंभीर जखमी केल्यानंतर त्याला साधे बसणे व उठणेसुद्धा जमत नव्हते. मोठ्या हिमतीने सुरेशने झाडावर चढून अस्वलापासून स्वतःची सुटका केली. मात्र, पुन्हा खाली उतरून गावाकडे येण्याची हिंमत त्याच्यात उरली नव्हती. अखेर स्वतःजवळील भ्रमणध्वनीने गावात सूचना देऊन मित्रमंडळींच्या आधाराने दवाखाना गाठला.



