
गोंदिया : लग्नापूर्वीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून एका २४ वर्षीय नवविवाहितेची बदनामी केल्याप्रकरणी आमगाव पोलिसांनी २५ मे रोजी एका माथेफिरू प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २४ वर्षांच्या या तरुणीचे लग्न शिवणी येथील एका तरुणासोबत १० एप्रिल २०२५ रोजी झाले होते. लग्न झाल्यापासून आरोपी हतनाराम राठोड (वय २५, रा. बोरोडा, ता. जि. सिरोही, राजस्थान) याने इन्स्टाग्रामवर तिच्या माहेरच्या नावाने आयडी तयार करून प्रोफाइलवर तिचा फोटो लावला. त्याने तिच्या सासरकडील आणि माहेरकडील लोकांना तिच्यासोबत लग्नापूर्वी काढलेले आक्षेपार्ह फोटो पाठवून ते व्हायरल करून तिची बदनामी केली.
इतकेच नव्हे तर, आरोपीने तिच्या पतीला आणि वडिलांना तब्बल १२ वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून वारंवार फोन करून लग्न तोडण्याची धमकी दिली.
या घटनेसंदर्भात २५ मे रोजी मिळालेल्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आरोपी हतनाराम राठोड याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (२), ३५६ (२), ७८ सह कलम ६७ (ए) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तिरुपती राणे करीत आहेत.



