भंडाराविदर्भ

तीन कामचुकार सफाई कामगारांना मुख्याधिकाऱ्यांनी केले निलंबित

तुमसर : साफसफाईच्या कामावर कुणालाही न सांगता विनापरवानगी गैरहजर राहून कामचुकारपणा करणाऱ्या तीन कामगारांना नगरपालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी तत्काळ प्रभावाने निलंबित केले. या कारवाईमुळे नगरपालिकेचे सफाई कामगार हादरले आहेत. सफाई कामगारांना असे निलंबित केल्याची ही पहिलीच घटना आहे.

मुकेश राणे, अनिता मोगरे, सुनंदा भोंडे अशी निलंबित करण्यात आलेल्या सफाई कामगारांची नावे आहेत. नगरपरिषद क्षेत्राची स्वच्छता करण्याची जबाबदारी शहर सफाई विभागाची आहे. यासाठी सफाई विभागामध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना प्रभागनिहाय स्वच्छताविषयक कामाची जबाबदारी कार्यालयाकडून सोपविण्यात आली आहे. गुरुवारी, १७ एप्रिलला सकाळी ९ वाजताच्या सुमारास प्रभागात मुख्याधिकारी प्यारेवाले यांनी कामावर अचानक भेट दिली. या दरम्यान, पहाणी केली असता तीन सफाई विनापरवानगीने गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या विहीत तरतुदी अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ७९ मधील (सहा) च्या तरतुदीनुसार तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. विभागीय चौकशीनंतर त्यांच्या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button