
गोंदिया : भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला प्रेरणा देणारे आणि राष्ट्रभावनेचे प्रतिक ठरलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत यंदा 150 व्या वर्षात प्रवेश करीत आहे. या एैतिहासिक गीताच्या सार्ध शताब्दी निमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन” म्हणून हा महोत्सव शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी स्टेडियम, गोंदिया येथे साजरा होणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन असून शहरातील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. देशभक्तीच्या भावनेने ओथंबलेला हा महोत्सव राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदियाचे तहसीलदार समशेर पठाण राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सारंग पटले व आय.एम.सी. गोंदियाचे अध्यक्ष डॉ. विजय गंदेवार उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दलजीत सिंग खालसा असून, निमंत्रक म्हणून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. एन. तुमडाम, तसेच गटनिदेशक ए. ए. शिंदे, जी. एम. श्रीगिरीवार, श्रीमती जे. एस. धोटे व पी. एल. कटरे उपस्थित राहतील.
या भव्य महोत्सवाचे आयोजन महर्षि अरविंद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया यांनी केले आहे. हा उपक्रम कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेले गीत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्थान ठरले. या गीतातून देशभक्ती, एकात्मता आणि मातृभूमीप्रेमाचा संदेश मिळतो. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतमातेच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



