गडचिरोलीविदर्भ

अहेरी पोलिसांची तत्परता! वयोवृद्धाची हरवलेली रोख रक्कम काही तासांत शोधली; खाकी वर्दीतील संवेदनशीलतेचे दर्शन

बोलेरो पिकअपमध्ये विसरलेली १३ हजार रुपयांची पिशवी पोलिसांनी मिळवून दिली ; गट्टू कन्नाबईना यांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान

अहेरी : अहेरी पोलिसांच्या दक्ष आणि तत्पर कारवाईमुळे एका वयोवृद्ध नागरिकाचा हरवलेला १३ हजार रुपयांचा ऐवज अवघ्या काही तासांत शोधून त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेची आणि संवेदनशीलतेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे.

देवलमरी (ता. अहेरी) येथील रहिवासी गट्टू नानाय्या कन्नाबईना हे ३० एप्रिल रोजी दुपारी घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी अहेरी येथे आले होते. त्यांनी आपली १३ हजार रुपयांची रोख रक्कम एका निळ्या रंगाच्या पिशवीत ठेवली होती. देवलमरी येथून वेंकटापूर–गोमनी मार्गावरील एका खाजगी बोलेरो पिकअप वाहनाने प्रवास करत असताना, अहेरी येथे उतरताना घाईगडबडीत त्यांची पिशवी वाहनातच विसरली आणि वाहन पुढे निघून गेले.

पिशवी हरवल्याचे लक्षात येताच कन्नाबईना यांनी अहेरी पोस्ट गाठले. तेथे उपस्थित असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) निकिता खेडेकर यांनी त्यांची विचारपूस करून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. PSI खेडेकर यांनी ट्रॅफिक विभागातील ज्ञानेश्वर निलावार (मेजर) यांच्याशी संपर्क साधून संबंधित वाहनाचा शोध घेण्यास सांगितले. तपासादरम्यान सदर वाहन आलापल्ली–मुलचेरा मार्गावर आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता केबिनमध्ये १३ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली निळी पिशवी सुखरूप सापडली.

ट्रॅफिक पोलिसांनी सदर रक्कम ताब्यात घेऊन अहेरी पोलीस स्टेशनला आणली. पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व रक्कम तातडीने गट्टू कन्नाबईना यांच्या स्वाधीन करण्यात आली. आपली कष्टाची कमाई परत मिळाल्याने वयोवृद्ध कन्नाबईना यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकला. अहेरी पोलिसांच्या या कामगिरीमुळे “पोलीस तुमच्या सेवेत” ही भावना अधिक दृढ झाली असून, नागरिकांमध्ये पोलिसांविषयीचा विश्वास आणखी बळकट झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button