
माजी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती ; पेढे वाटून आणि फटाक्यांच्या अतिषबाजीत कार्यकर्त्यांचा उत्साह
देसाईगंज : देशातील पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत यशाचे पडसाद देसाईगंज शहरात उमटले आहेत. या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ४ मे रोजी देसाईगंज नगर परिषद परिसरासमोर भाजप महायुतीच्या वतीने भव्य जल्लोषाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या विजयामुळे संबंधित राज्यांमध्ये विकासाला नवी उभारी मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकमेकांचे तोंड गोड केले आणि फटाके फोडून जल्लोष केला.
या प्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगराध्यक्ष लता सौंदरकर, उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते युनुसभाई शेख, आकाश अग्रवाल, मुरलीधर सौंदरकर, रोशनी पारधी, पिंकू बावणे, राजेश जेठाणी, भाविआ साधवानी, विलास लोखंडे, बाळकृष्ण माडूरवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिला आघाडीच्या नेत्या भारती कुथे, ज्योशना लुटे, पार्वता बेदरे आणि पल्लवी मेंढे यांनीही विजयाचा आनंद साजरा केला.
या विजयामुळे भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय पातळीवरील पकड अधिक मजबूत झाली असून, त्याचा सकारात्मक परिणाम आगामी काळातील स्थानिक राजकारणावरही होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



