
कटंगी-गोंदिया लोकलमधील घटना; मृताची ओळख पटवण्याचे आव्हान
गोंदिया : कटंगी-गोंदिया या लोकल रेल्वे गाडीच्या बोगीत गळफास घेऊन एका अज्ञात युवकाने आत्महत्या केल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण आणि मृताची ओळख अद्यापही पटलेली नाही.
बिरसोला रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली की, रेल्वे क्रमांक ७८८०६ (कटंगी-गोंदिया) या गाडीच्या १९९०५५ एसईसीआर क्रमांकाच्या बोगीमध्ये एक तरुण शेंदरी रंगाच्या गमछाला (दुपट्टा) लटकलेल्या अवस्थेत आढळला. माहिती मिळताच गोंदिया लोहमार्ग पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. गोंदिया रेल्वे स्टेशन येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्या व्यक्तीला मृत घोषित केले. याप्रकरणी गोंदिया रेल्वे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (Accidental Death) नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ वर्षे असून, त्याची उंची ५ फूट ४ इंच, बांधा सडपातळ आहे. त्याने मळकट चेक्सचा हाफ बाहीचा शर्ट, निळ्या रंगाचा फुलबाही टी-शर्ट आणि निळसर मळकट रंगाचा लोवर परिधान केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार रमेश भालेराव करत आहेत. पोलिसांनी या मृताची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.



