गडचिरोलीविदर्भ

पुराडा मंडळ अधिकारी कार्यालय ‘रामभरोसे’; कर्मचारी तालुका मुख्यालयात, नागरिक वाऱ्यावर!

​कुरखेडा : तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या पुराडा येथील मंडळ अधिकारी कार्यालय सध्या प्रशासकीय अनास्थेचा उत्तम नमुना बनले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यालयात मंडळ अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा पत्ताच नसल्याने ‘कार्यालय आहे, पण अधिकारी नाही’ अशी दुरवस्था निर्माण झाली आहे. परिणामी, परिसरातील सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून येथील संपूर्ण कारभार सध्या ‘रामभरोसे’ सुरू असल्याचे चित्र आहे.

​पुराडा हे परिसरातील अनेक गावांसाठी महसुली कामांचे मुख्य केंद्र आहे. नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, शेतीविषयक समस्या आणि अन्य शासकीय कामांसाठी या कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून मंडळ अधिकारीच कार्यालयात फिरकले नसल्याने नागरिकांची महत्त्वाची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. दररोज शेकडो नागरिक आशेने कार्यालयात येतात, परंतु कर्मचारी हजर नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने आणि संतप्त होऊन परत जावे लागत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पुराडा कार्यालयांतर्गत येणारे संबंधित कर्मचारी आपल्या मूळ कर्तव्याच्या ठिकाणी हजर राहण्याऐवजी तालुका मुख्यालयी (कुरखेडा) ठाण मांडून बसणे अधिक पसंत करतात. “आपली नियुक्ती ग्रामीण भागात असताना, हे कर्मचारी काम नसतानाही तालुका मुख्यालयात का बसतात?” असा रोखठोक आणि संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिक स्तरावर अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने पदरमोड करून, आर्थिक भुर्दंड सोसत थेट तालुका मुख्यालय गाठावे लागत आहे.

​एकीकडे शासन ‘प्रशासन आपल्या दारी’ अशा मोठ्या घोषणा देत असताना, पुराड्यात मात्र या घोषणेचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळापासून येथे एकही जबाबदार अधिकारी फिरकला नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या शैक्षणिक वर्ष सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज आहे, तसेच शेतकऱ्यांनाही शेतीविषयक कामांसाठी महसूल विभागाची गरज पडत आहे. अशा वेळी अधिकारी गायब असल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

​”आम्ही आमच्या हक्काच्या कामासाठी कोणाकडे जायचे? गावात शासनाने कार्यालय दिले आहे, मग तरीही जर आम्हाला छोट्या-छोट्या कामांसाठी तालुक्याला हेलपाटे मारावे लागत असतील, तर हे कार्यालय फक्त नावापुरतेच उघडले आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.

​या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली जाणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी आणि संबंधित तहसीलदारांनी तत्काळ पुराडा मंडळ अधिकारी कार्यालयातील या अनागोंदी कारभाराची आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची चौकशी करावी. तसेच कर्तव्यावर दांडी मारून तालुका मुख्यालयात बसणाऱ्या अशा कर्तव्यचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी आता पुराडा परिसरातील जनतेकडून तीव्रतेने केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button