संसर्गजन्य आजार नियंत्रणासाठी राज्यात विशेष कृती दल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोदरेज कन्झ्युमर्सचा सकारात्मक प्रतिसाद ; ‘एम्बेड‘ प्रकल्पाला गडचिरोलीसह सहा जिल्ह्यांत लक्षणीय यश
मुंबई : महाराष्ट्रातून मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या संसर्गजन्य आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला गोदरेज कन्झ्युमर कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, आता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), सार्वजनिक आरोग्य विभाग आणि गोदरेज कन्झ्युमर्स यांचे एक विशेष कृती दल (Special Task Force) स्थापन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, या उपक्रमामुळे संपूर्ण राज्यात संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी सुसंगत, वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक आराखडा तयार होईल. सार्वजनिक आरोग्य विभाग व गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या ‘एम्बेड’ (EMBED) प्रकल्पाने गडचिरोलीसह राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये लक्षणीय यश मिळवले आहे.
संसर्गजन्य आजारांवर योग्य निदान आणि प्रतिबंधात्मक व्यवस्थापन करण्यासाठी ‘एम्बेड’ प्रकल्पांतर्गत मोठे प्रशिक्षण अभियान राबवले गेले: उपचार प्रशिक्षण: ४०० हून अधिक वैद्यकीय अधिकारी, सामान्य चिकित्सक व बालरोगतज्ज्ञांना आधुनिक उपचार पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले. रोगनिदान क्षमता: १८० प्रयोगशाळा निरीक्षण अधिकारी आणि १६५ कीटकशास्त्रज्ञांना (Entomologists) प्रशिक्षण देऊन रोग निदान आणि प्रतिबंध अधिक सक्षम करण्यात आले. तात्काळ तपासणी: गडचिरोली, नाशिक, सातारा आणि पालघर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये तातडीने तपासणी मोहीम राबवली गेली.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि गोदरेज कंपनीने समुदाय पातळीवर जनजागृती मोहीम आणि गृहभेटींसारख्या योजना राबवल्या. या उपक्रमातून १ लाखांहून अधिक घरांना भेटी देण्यात आल्या. विशेषतः गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात ५२ हजारांहून अधिक लोकांना याचा थेट लाभ मिळाला.
‘एम्बेड’ प्रकल्पाच्या यशाचे आकडे: राज्यात २०२४ मध्ये डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या २७ टक्क्यांनी घटली. डेंग्यू तपासण्यांचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले. या यशस्वी मॉडेलमुळे राज्यात भविष्यात साथीच्या आजारांची जलद तपासणी आणि तत्काळ उपचार मिळण्यास गती मिळणार आहे.



