
२५ लिटर दारू नष्ट
गडचिरोली : भामरागड शहरातील अवैध दारूविक्रीचा बिमोड करण्यासाठी मुक्तीपथ, शक्तीपथ स्त्री संघटना आणि शहर संघटनेने कंबर कसली आहे. वॉर्ड क्र. ४ आणि ११ मध्ये रिकाम्या थाळ्या आणि वाट्या वाजवून दारूविक्रेत्यांचे लक्ष वेधत अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. सोबतच व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला.
संबंधित दोन्ही वॉर्ड मध्ये आयोजित बैठकांमध्ये मुक्तीपथ कार्यकर्त्यांनी नागरिकांना दारूचे भीषण वास्तव समजावून सांगितले. दारूमुळे यकृत (Liver), किडनी आणि हृदयावर गंभीर परिणाम होतात. कर्करोगासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. घरातील शांतता भंग पावून घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढतात, ज्याचा सर्वाधिक त्रास महिला आणि मुलांना होतो. रोजंदारीचा मोठा हिस्सा दारूवर खर्च झाल्यामुळे कुटुंब कर्जबाजारी होते आणि मुलांचे शिक्षण थांबते. असे अनेक समस्यांसाठी दारू ही कारणीभूत आहे. यासाठी अवैध दारूविक्री थांबविणे आवश्यक असल्याची बाब पटवून दिली. जनजागृती करताना पोलीस निरीक्षक सचिन सेवाडे यांनी उपस्थितांना कायद्याची जाणीव करून दिली. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार विनापरवाना दारू विक्री, वाहतूक किंवा साठा करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो. अवैध दारू गाळणे आणि विक्री करणे यासाठी कडक कारावास आणि दंडाची तरतूद आहे. दरम्यान, थाळी वाजवून दारूविक्रेत्यांचे व शहरवासीयांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच बोल रे बोल हल्ला बोल, दारू वर हल्ला बोल. जे दारूत रंगले, त्यांचे करिअर भंगले. उठ रे तरुणा जागा हो, दारू बंदीचा धागा हो. दारू सोडा, कुटुंब जोडा. असे घोषवाक्य देत दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक निळा किन्नाके, शहर संघटन अध्यक्ष भारती ईष्टाम, मुक्तीपथ शक्तीपथ संघटना अध्यक्ष शमशीर पठाण, निर्मला सडमेक, तालुका उपसंटक भुपेंद्र सडमेक, तालुका प्रेरक महेंद्र उसेंडी, शिला एमपलवार, रोशनी पठाण, कुसुम वेलादी, प्रथमेश, ऋतुजा यांच्यासह शहरातील संघटना सदस्य व ईरत नागरीक उपस्थित होते.
२५ लिटर दारू नष्ट
बैठकीनंतर संबंधित दोन्ही वॉर्ड मध्ये दारूविक्री विरोधात अहिंसक कृती करण्यात आली. शोध मोहिमेत सापडलेली २५ लिटर अवैध दारू सर्वांसमोर नष्ट करण्यात आली. “व्यवसाय थांबवा, अन्यथा तुरुंगात जाण्यासाठी तयार राहा,” असा इशारा यावेळी देण्यात आला.



