गडचिरोलीविदर्भ

‘महाराजस्व समाधान शिबिर’! शेकडो प्रलंबित प्रकरणे निकाली; नागरिकांना एकाच छताखाली महसूल सेवांची प्रचिती

आ. डॉ. मिलिंद नरोटे व आ. रामदास मसराम यांच्या हस्ते लाभ वाटप ; दुर्गम भागातील जनतेला प्रशासनाचा मोठा आधार

गडचिरोली : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील १० महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांच्या अनेक महसुली तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणे जागेवरच निकाली काढण्यात आली.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पार पडलेल्या या शिबिरांना लोकप्रतिनिधींनी भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या: येणापूर येथे आयोजित शिबिरात आमदार डॉ. मिलिंद नरोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. प्रशासनाच्या या गतिमान कामाचे त्यांनी कौतुक केले. देऊळगाव येथे आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. दुर्गम भागातील नागरिकांच्या दारी प्रशासन पोहोचणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या शिबिरांमध्ये बाम्हणी, पेरमिल्ली, येणापूर, देऊळगाव, मालेवाडा, बेळगाव, पेंटीपाका, ताडगाव, सुरसुंडी आणि कोटमी या महसूल मंडळांतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. शिबिरात दाखले वाटप: उत्पन्न, जातीचे दाखले व डोमिसाईल प्रमाणपत्रे. जमीन नोंदी: वारस नोंद, नोंदवही दुरुस्ती आणि फेरफार प्रकरणांचा निपटारा. शासकीय योजना: विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन व लाभ वितरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या अभियानाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, हे अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून, जिल्ह्यातील इतर मंडळांमध्येही १० एप्रिल, १७ एप्रिल, २४ एप्रिल, ८ मे आणि १५ मे रोजी ही शिबिरे आयोजित केली जातील.

तहसील प्रशासन आणि विभागीय अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे दुर्गम भागातील शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या अर्जांची तत्काळ छाननी करून त्यांना न्याय देण्यात आला. या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील महसूल प्रशासन खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button