गडचिरोलीविदर्भ

वडसा येथे निरंकारी मंडळाच्या शिबिरात २६९ युनिट रक्त संकलित

रक्तदान हीच निष्काम सेवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे गौरवोद्गार; ४१ महिलांचाही सक्रिय सहभाग

देसाईगंज (वडसा) : “रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको” हा मानवतावादी संदेश जपत संत निरंकारी मंडळ शाखा वडसा (देसाईगंज) च्या वतीने शुक्रवारी (दि.२४) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘मानव एकता दिना’चे औचित्य साधून आयोजित या शिबिरात २२८ पुरुष आणि ४१ महिला अशा एकूण २६९ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून मानवतेचे दर्शन घडविले.

दुपारच्या सत्रात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “रक्तदान हे जगातील सर्वात मोठे निष्काम सेवा कार्य आहे. देसाईगंज शाखा मागील १७ वर्षांपासून हे सेवाकार्य अविरतपणे करत आहे, हे अत्यंत भूषणावह आहे.” त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी प्रसन्नजीत प्रधान, माजी आमदार कृष्णा गजबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आरमोरी रोडवरील सत्संग भवन येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. शिबिरासाठी एकूण ३२३ रक्तदात्यांनी नोंदणी केली होती. आरोग्य तपासणीनंतर पात्र ठरलेल्या २६९ जणांनी रक्तदान केले. विशेषतः महिलांचा वाढता सहभाग या शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांनी सांगितले की, “जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने त्यांनी मंडळाला विनंती केली होती. मानवसेवेचा वारसा जपत मंडळाने तातडीने या शिबिराचे आयोजन केले.” तसेच, आजवर निरंकारी मंडळाने देशभरात १३ लाखांहून अधिक युनिट रक्तदान केल्याची माहितीही त्यांनी दिली.

शिबिराच्या पूर्वसंध्येला (२३ एप्रिल) सेवादलाच्या स्त्री-पुरुष सदस्यांनी गणवेशात शहरातून भव्य बाईक रॅली काढली होती. हुतात्मा स्मारकापासून निघालेल्या या रॅलीद्वारे शहरभर रक्तदानाचे महत्त्व पटवून देत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते, ज्याचा सकारात्मक परिणाम आजच्या गर्दीवरून दिसून आला.

रक्त संकलनासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयाचे डॉ. मुकुंद दाभाडे, डॉ. नागेश शाहू आणि भंडारा रक्तपेढीच्या डॉ. अदिती पांडे यांच्या चमूने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सेवादल संचालक नानकराम कुकरेजा यांनी केले, तर आभार पुरुषोत्तम डेंगानी यांनी मानले. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले असून, वडसा शहरात आज खऱ्या अर्थाने मानवतेचा उत्सव साजरा झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button