क्राईमगडचिरोलीविदर्भ

जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

एकाच महिलेला लक्ष्य करून दोन वेगवेगळ्या ठिकाणी केली होती लूट

गडचिरोली : जिल्ह्यात जबरी चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी एकाच महिलेला दोन वेळा लक्ष्य करून लाखो रुपयांची रोकड लंपास केली होती.

पहिली घटना १९ जून रोजी घडली. प्रिया विकास मंडल नावाची महिला आपल्या दुचाकीने चामोर्शीहून घोटकडे जात असताना, हनुमान मंदिराजवळ दोन मोटरसायकलस्वारांनी तिच्या पाठीवरची १ लाख २५ हजार रुपयांची बॅग हिसकावून घेतली. या घटनेनंतर, ५ सप्टेंबर रोजी हीच महिला पुन्हा एकदा गणपूर ते चामोर्शीकडे जात असताना, दोन हेल्मेट घातलेल्या मोटरसायकलस्वारांनी तिच्याकडून १ लाख ३४ हजार रुपयांची बॅग हिसकावली. या दोन्ही घटनांमध्ये चोरीची पद्धत सारखीच असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि चामोर्शी पोलीस स्टेशनची दोन पथके तयार केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी शशांक संजय दुर्गे (वय २७) आणि राजा तोताराम कोरडे (वय २५) या दोघांना (दोघेही रा. मलेझरी, ता. मुलचेरा) ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या आरोपींचा अशाच प्रकारच्या इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याचाही तपास करत आहेत. पुढील तपास सपोनि सुमित बनसोडे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि भगतसिंग दुलत, पोहवा सतिश कत्तीवार, नापोअं धनंजय चौधरी, पोअं राजू पंचफुलीवार, शिवप्रसाद करमे, चापोअं दिपक लोणारे यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button