
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्रा’तर्फे आयोजित व्याख्यानात, पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. गंगाधर बनबरे यांनी संत तुकारामांचे विचार आजही कसे ‘कालातीत‘ आहेत, हे स्पष्ट केले. ते म्हणाले की, संत तुकारामांचे तत्त्वज्ञान हे मानवी जीवनाच्या मूलभूत मूल्यांवर आधारित असून, त्यांचे अभंग आजच्या गुंतागुंतीच्या जगातही आपल्याला दिशा देतात.
डॉ. बनबरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांतून मांडलेले विचार हे कोणत्याही जाती किंवा धर्माच्या पलीकडचे आहेत. समाजातील विषमता दूर करण्यासाठी संत परंपरेने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे आणि या परंपरेत मानवी मूल्यांचे चिंतन केलेले आहे. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले की, तुकारामांचे विचार सद्यस्थितीत समाजासाठी कसे उपयुक्त आहेत.
‘संत तुकारामाची कालातीतता’ या विषयावरील हे व्याख्यान १८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या नवीन सभागृहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते, तर नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्र-अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, अध्यासन समिती सदस्य डॉ. नरेंद्र आरेकर, सिनेट सदस्य, संत तुकाराम महाराज अध्यासन प्रस्तावक व सल्लागार समितीचे आजीवन सदस्य डॉ. दिलीप चौधरी, अध्यासन केंद्राचे समन्वयक हेमराज निखाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार सुधाकर अडबाले यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या प्रगतीचे कौतुक केले आणि विद्यापीठाचा नावलौकिक महाराष्ट्रात वाढावा यासाठी शुभेच्छा दिल्या. सिनेट सदस्य डॉ. दिलीप चौधरी यांनी अध्यासन केंद्राच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाला शहरातील अनेक नागरिक, शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.



