
जाहिरातबाजी टाळून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक जाहिरातबाजी टाळून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’स योगदान देण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी एक लाख रुपयांची थेट मदत दिली आहे. त्यांच्या या कृतीने सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाचा सार्वजनिक उत्सव साजरा न करता, तो समाजोपयोगी कार्यांसाठी निधी वापरण्यात यावा, असे आवाहन केले होते. जाहिराती, फलक, पुष्पगुच्छ किंवा हार यावर होणारा अनावश्यक खर्च टाळून लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विधायक कार्यासाठी निधी वापरण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाला प्रेरणा घेत, डॉ. अशोक नेते यांनी सोमवार, २१ जुलै रोजी आयसीआयसीआय बँकेमार्फत RTGS द्वारे थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांचा निधी जमा केला. ही निव्वळ प्रतीकात्मक नव्हे, तर प्रभावी सामाजिक योगदान देणारी कृती ठरली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपयोग राज्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत करण्यासाठी, तसेच अत्यवस्थ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी होतो. त्यामुळे या निधीला दिलेले योगदान म्हणजे माणुसकीच्या कार्यात केलेली प्रत्यक्ष मदत होय.
“या कृतीतून इतर लोकप्रतिनिधी, समाजसेवक व नागरिकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सहभाग नोंदवावा, हीच अपेक्षा आहे,” असे डॉ. नेते यांनी नम्रपणे सांगितले. त्यांच्या या उदाहरणातून केवळ आर्थिक मदत नव्हे, तर संवेदनशील नेतृत्व व जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. अशोकजी नेते यांची प्रतिमा अधिक उजळली आहे.



