
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ‘विमाशि‘ संघाचा एल्गार ; शालार्थ आयडीसह अनेक प्रकरणे रखडली
गडचिरोली/नागपूर : नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक (D.D.E.) कार्यालयात शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शेकडो प्रश्न प्रलंबित असल्याने शिक्षक वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रलंबित समस्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या (विमाशि) वतीने सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात सोमवार, १० नोव्हेंबर रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या कार्यालयासमोर दुपारी ३ वाजेपासून ‘समस्या सुटेपर्यंत ठिय्या आंदोलन’ करण्यात येणार आहे.
आमदार अडबाले यांनी ७ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या समस्या निवारण सभेत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही, तसेच सभेचे इतिवृत्तही अद्याप देण्यात आलेले नाही. मार्च महिन्यापासून पवित्र पोर्टलद्वारे रुजू झालेले, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या झालेले, तसेच अल्पसंख्याक शाळा/महाविद्यालयांमधील शिक्षक-कर्मचाऱ्यांची शालार्थ आयडी प्रकरणे प्रलंबित आहेत. पोस्ट अटॅच-डिटॅचची कार्यवाही प्रलंबित आहे. शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. भंडारा व वेतन पथक (माध्य.) भंडारा यांच्या नियमबाह्य प्रकरणांबाबत तक्रार करूनही चौकशी समितीने अद्याप चौकशी पूर्ण केलेली नाही. आ. अडबाले यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या समस्या निवारण सभेसाठी २१ सप्टेंबर व ४ ऑक्टोबर रोजी पत्र देऊनही उपसंचालकांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. या बाबींचा समावेश आहे.
या सर्व मागण्यांसाठी सोमवार, १० नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ‘विमाशि’ संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नैताम आणि जिल्हा कार्यवाह अजय लोंढे यांनी नागपूर विभागातील सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समस्याग्रस्त शिक्षक-कर्मचारी यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाचे निवेदन शिक्षण संचालक (पुणे), प्रधान सचिव (शालेय शिक्षण विभाग, मुंबई) आणि शिक्षण आयुक्त (पुणे) यांना पाठवण्यात आले आहे.



