
गोंदिया : “कॅन्सरचे नाव ऐकताच मनात काळोख दाटून येतो, पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे आमच्या घरात पुन्हा एकदा आशेचा किरण मिळाला,” हे शब्द आहेत गोंदियातील कुंभारे नगर येथील ५५ वर्षीय अलका भारत गजभिये यांचे. त्यांची घरची परिस्थिती सामान्य असल्यामुळे, कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचाराचा खर्च त्यांच्या कुटुंबासाठी एक मोठा प्रश्न बनला होता.
उपचारासाठी होणारा वाढता खर्च पाहून, “आता पुढे काय? उपचार थांबतील का?” या प्रश्नांनी गजभिये कुटुंब चिंतेत होते. याचवेळी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले. या मदतीमुळे कॅन्सर केअर क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या उपचारांना पुन्हा गती मिळाली.
अलका गजभिये यांच्या मुलीने डोळ्यांत पाणी आणून सांगितले, “पैशांअभावी आईचे उपचार थांबतील की काय अशी भीती होती. पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे आता आम्हाला आधार मिळाला आहे. आई पुन्हा बरी होईल, असा विश्वास वाटतो.” गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाचा आधार किती महत्त्वाचा ठरतो, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी खऱ्या अर्थाने अनेक गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ‘जीवनदान’ ठरत आहे.



