
गोंदिया : प्रधानमंत्री मातृवंदन योजनेंतर्गत १.० पोर्टलमधील काही लाभार्थी लाभापासून वंचित राहून गेले होते. मात्र, त्यांना घाबरण्याची गरज नसून त्यांनाही लाभ मिळणार आहे. याकरिता पेमेंट जनरेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेची जानेवारी २०१७ ते २०२२ या कालावधीत अंमलबजावणी करण्यात आली असून मार्च २०२३ अखेर एकूण ५५ हजार ७१६ गरोदर मातांची नोंदणी करण्यात आली होती. त्यात एक लाख ६५ हजार ५०२ लाभार्थी अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी एक लाख ५३ हजार ८९३ लाभार्थीच्या आधार सीड खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.
१ एप्रिल २०२३ पासून २.० नवीन अद्ययावत पोर्टल सुरू करण्यात आले असून मागील पोर्टल बंद करण्यात आले आहे तरी केंद्र सरकारकडून मागील पोर्टलमधील लाभार्थी ज्यांना अद्याप लाभ मिळाला नाही असे वर्ष २०१६ पासून एकूण ९४१६ लाभार्थीपैकी ७४५३ लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून २४३ लाभार्थ्यांची यादी अप्राप्त आहे. त्यात प्रामुख्याने गोंदिया शहरी विभागातील लाभार्थी समाविष्ट आहेत. ६९८१ लाभार्थ्यांची आजपर्यंत सर्व माहिती तालुका नियंत्रण पथकाच्या आयडीवरून अद्ययावत केली असून ५४६ लाभार्थी उपजत मृत्यू, गर्भपात झाले असल्याने बंद करण्यास्तव केंद्र शासनाला पाठविले असल्याची माहिती प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचे जिल्हा समन्वयक कैलास खांडेकर यांनी दिली आहे.
सद्यःस्थितीत शासनाकडून लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याच्या दृष्टिकोनातून पेमेंट जनरेशनचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून लाभार्थीस आधार संलग्न खात्यात लाभ जमा केला जाणार आहे. त्याची माहिती लाभार्थीला आधारवरील जोडणी असलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश स्वरूपात येणार आहे. त्यात बँक खाते व नाव समाविष्ट असेल याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीकरिता आपल्या कार्यक्षेत्रातील तालुका नियंत्रण पथक कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.



