
वांगेपल्ली गावाजवळील गेर्रा चौक परिसरात अहेरी पोलिसांची कारवाई
अहेरी : अहेरी पोलिसांनी अवैध हुक्का तंबाखूच्या तस्करीवर मोठी कारवाई करत सुमारे ६ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, ही कारवाई वांगेपल्ली गावाजवळील गेर्रा चौक परिसरात गेल्या शुक्रवारी उशिरा करण्यात आली.
अहेरी पोलीस ठाण्याच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, एका वाहनातून अवैध हुक्का तंबाखूची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गेर्रा चौक परिसरात सापळा रचला. मारुती सेलेरीओ (क्र.एमएच 33-ए 4301) या संशयित वाहनाची तपासणी केली असता, पोलिसांना पांढऱ्या प्लास्टिकच्या चुंगड्यांमध्ये ‘मजा १०८’ हुक्का शिशा तंबाखूचे ३६० डब्बे आढळून आले. पोलिसांनी सांगितले की, या प्रत्येक डब्ब्याची किंमत ९३५ रुपये असून, हे डब्बे विक्रीसाठी वाहतूक केले जात होते. जप्त करण्यात आलेल्या तंबाखूची एकूण किंमत ३ लाख ३६ हजार ६०० रुपये आहे.
यासोबतच पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील ३ लाख रुपये किंमतीची मारुती सेलेरीओ कार देखील जप्त केली आहे. त्यामुळे या कारवाईतील एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ६ लाख ३६ हजार ६०० रुपये आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पराग अरविंद रामटेके (वय ३९, रा. सुलेझरी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर, सध्या रा. अहेरी) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गु.र.क्र. ११७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २७४, २७६ व २७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक फैयाक रजाक शेख यांनी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सागर माने यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.



